सडक/अर्जुनी : एखादा प्रसंग कोसळल्यास समयसुचकता आणि हिंमत किती महत्वाची असते, हे दाखवून देणारे प्रसंग सडक/अर्जुनी तालुक्यात घडले. आजारी वडिलाला रूग्णालयात दाखल करण्यासाठी अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाने समयसुचकता दाखवून व ट्रक चालवून वडिलांना रूग्णालयात नेऊन वडिलांचे प्राण वाचविले. त्यामुळे त्या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.रायपूर ते इंदोरा येथे ट्रक घेवून जात असताना दि. ५ आॅक्टोबरला ट्रक मालक गिरीजाशंकर, त्यांचा मुलगा अतुल गिरजाशंकर (९) व मुलगी आचल (७) असे तिघे राष्ट्रीय महामार्ग ६ वरुन ट्रकने इंदोरा येथे जात होते. दरम्यान सडक/अर्जुनी जवळील सावंगी धाब्यावर ट्रक थांबविण्यात आले. त्यानंतर ट्रक चालक गिरजाशंकर (५५) याची प्रकृती अचानक बिघडली व ते बेशुद्ध झाले. मुलाने आजूबाजूला डॉक्टर आहेत का, याची चौकशी केली. जवळ डॉक्टर नाही, तेथून सहा किलोमीटरवर सौंदड येथे डॉक्टर आहे, असे मुलांना सांगण्यात आले. जवळ डॉक्टर नाही हे लक्षात येताच आणि कोणताही विलंब न करता ९ वर्षाच्या अतुल गिरजाशंकरने १० चाकी ट्रक चालविला. या चिमुकल्याने ट्रकचे स्टेअरींग आपल्या हातात घेऊन बेशुद्ध वडिलांना घेऊन ट्रक चालवित सौंदडला गेला. बस स्थानकाच्या बाजूला ट्रक थांबवून जोरात रडायला लागला. मुलाला ट्रकमधून कोणीतरी जबरदस्तीने पळवून नेत आहे, असे काही नागरिकांना वाटले व त्याठिकाणी नागरिक जमा झाले. तेव्हा मुलाने माझे वडील बेशुद्ध आहेत, त्यांना रूग्णालयात घेऊन चला, अशी विनंती केली. लगेच नागरिकांनी डॉ. गहाणे यांच्या रूग्णालयात त्याच्या वडिलांना दाखल केले.काही तासानंतर गिरीजाशंकर हे शुद्धीवर आले. वडिलांचे प्राण वाचल्याचा आनंद त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. चिमुकल्याने ट्रकचे स्टेरिंग आपल्या हातात घेतले नसते तर कदाचित विपरीत घडले असते. चौथ्या वर्गात शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या अतुलची सौंदड येथील नागरिक खुप स्तुती करीत होते. लहान मुलांनी हिंमत दाखवून ट्रक चालवून बेशुद्ध वडिलांना रूग्णालयात भरती केले आणि प्राण वाचविले.ट्रक चालवित मुलांनी वडिलांना दवाखान्यात आणले. यावर आधी गावकऱ्यांना विश्वास बसला नाही. नागरिकांनी तू हा ट्रक कसा चालविला, आम्हालाही चालऊन दाखव, असे म्हटल्यावर मुलाने त्यांनाही ट्रक चालवून दाखविला. यावर तेव्हा नागरिकांचा विश्वास बसला व त्याच्या धाडसाची दाद दिली. (तालुका प्रतिनिधी)
नऊ वर्षाच्या बालकाने वाचविले ट्रकचालक वडिलांचे प्राण
By admin | Updated: October 16, 2014 23:27 IST