२४ पर्यंत वनकोठडी : खडकी कक्षातील कारवाई सडक-अर्जुनी : नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात जावून बांबू तोडणे त्या भागातील नागरिकांना महागात पडले. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय डोंगरगाव/डेपो अंतर्गत येणाऱ्या खडकी कक्ष क्र.५६३ मधील जंगलात बांबूची चोरी करताना वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक बागडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन नऊ आरोपींना पकडण्यात यश मिळविले. राजगुडा येथील प्रदीप बोरकर, सुनील मडावी, सुरेश मडावी, प्रमोद विठोडे, उमेश उईके, विनोद इळपाते, कैलाश आचले, रमेश उईके यांना मुद्देमालासह पकडण्यात आले. हे आरोपी नेहमी वन्यजीव विभागातील वनाची चोरी करीत असल्याची चर्चा होती. व्याघ्र प्रकल्पातून बांबू आणणे व त्यातून चटई बनवून विकणे हा यांचा धंदा होता. २० मार्च रोजी सकाळी १० वाजता खडकी बिटमध्ये या नऊ आरोपींना पकडण्यात आले. आरोपींना अटक करून २४ मार्चपर्यंत वन कोठडी घेण्यात आली आहे. आरोपी राजगुडा येथील आहेत. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी बागडे, वनरक्षक शुभम बरैय्या, शैलेंद्र भदाणे, संजय कटरे, क्षेत्र सहायक राजू तिरपुडे, परशुराम जोशी, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रिता वैद्य व त्यांच्या चमुने ही कारवाई केली.(शहर प्रतिनिधी)
व्याघ्र प्रकल्पातील बांबू तोडणाऱ्या नऊ जणांना अटक
By admin | Updated: March 22, 2017 01:16 IST