पटेल गरजले : भाजपच्या पापांमध्ये आता काँग्रेसचाही वाटागोंदिया : तत्वांशी जडजोड करीत ज्या भाजपशी हातमिळवणी केली, त्या भाजपविरूद्ध आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच जिल्ह्यातील काँग्रेसने गमावला आहे. गेल्या १६ महिन्याच्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारकडून काय मिळाले आणि काय गमावले हे नागरिकांना आता कळत आहे. आता त्याच भाजपशी हातमिळवणी करीत काँग्रेस त्या पापाचा वाटेकरी होत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये, त्यांच्या अभद्र युतीचा धडा लोकच त्यांना शिकवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवरील लोकांचा विश्वास वाढत असून पुढील दिवस आपलेच आहेत, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.येथील एनएमडी कॉलेजमधील भरगच्च भरलेल्या सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, जि.प.चे गटनेता गंगाधर परशुरामकर, जिल्हा महिला राकाँच्या अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, पंचम बिसेन, मनोहर चंद्रीकापुरे, शहराध्यक्ष शिव शर्मा, माजी नगराध्यक्ष आशा पाटील, केवल बघेले, डॉ.अविनाश काशीवार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.सुरूवातीला खा.पटेल यांच्या हस्ते जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीला बहुमत मिळवून देणाऱ्या संचालकांचाही सत्कार केला.यावेळी मार्गदर्शन करताना खा.पटेल म्हणाले, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २० सदस्य निवडून आले ही बाब समाधानाची आणि अभिमानाची आहे. निवडणुकीच्या वेळी भाजप सरकारविरूद्ध प्रभावीपणे वातावरण तयार करण्याचे काम आम्ही केले. त्याचा फायदा काँग्रेसलाही झाला. सोबत-सोबत लढलो असतो तर भाजपला २-४ जागांवर समाधान मानावे लागले असते. गेल्यावेळी आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढविली. काँग्रेसपेक्षा कमी जागा घेऊनही राष्ट्रवादीच्या जागा जास्त आल्या होत्या. यावेळी तर आपली ताकद कितीतरी वाढली. स्वतंत्रपणे लढूनही २० जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. आम्ही ठरविले असते तर भाजपसोबत आम्हालाही जाता आले असते, पण आम्ही कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या भावनांचा आदर करतो. जनतेने आम्हाला ज्या भाजपविरूद्ध कौल दिला त्यांच्याशी हात मिळविणे हा जनतेचा विश्वासघात आहे, पण काँग्रेसने तो विचार केला नाही. आम्ही सत्तेत नाही याची खंत बाळगू नका. यश-अपयश हे जुळलेलेच असते. आमची ताकद कुठेही कमी झालेली नाही, ती दिवसेंदिवस वाढतच आहे. जनतेची कामे करून त्यांना आपल्याशी जुळवा, असे आवाहन यावेळी पटेल यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना केले. (जिल्हा प्रतिनिधी)
पुढील दिवस राष्ट्रवादीचेच
By admin | Updated: August 31, 2015 01:33 IST