गोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. याला ‘ब्रेक द चेन’ असे नाव दिले आहे. याअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तर वृत्तपत्रांचे नियमित वितरण सुरू राहणार आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपक कुमार यांनी सोमवारी (दि. ५) नवीन निर्बंध लागू केले आहेत. या संबंधीचे आदेश रात्री उशिरा काढण्यात आले. हे नवीन निर्बंध ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.
जिल्ह्यात कलम १४४ ची अंमलबजावणी व रात्री संचारबंदी, संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू राहील. या कालावधीत ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, अनावश्यकरीत्या कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय शहरात व गावात शिरू नये वा फिरू नये व त्यांनी त्यांच्या घरात वास्तव्य करावे. संचारबंदी कालावधीत वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा यांना हालचाल करण्यास कुठल्याही निर्बंधाशिवाय परवानगी राहणार आहे.
........
या सेवा राहणार सुरू
हॉस्पिटल, रुग्णालये, उपचार केंद्रे, क्लिनिक्स, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने, औषधालये, रुग्णालये, नर्सिंग होम, वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, तसेच इतर वैद्यकीय व आरोग्य सुविधा सेवा, किराणा, भाजीपाला दुकाने, दुग्ध केंद्र व डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने व इतर खाद्यपदार्थांची दुकाने, सार्वजनिक वाहतूक सेवा रेल्वे, टॅक्सी, ऑटो, रिक्षा व बस सेवा, स्थानिक प्रशासनाकडून सर्व प्रकारची सार्वजनिक सेवा अंतर्गत असलेली कामे व वृत्तपत्र सेवा सुरु राहणार आहे.
..........
हे राहील बंद
अत्यावश्यक सेवेमधील दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, मार्केट, मॉल्स हे बंद राहतील. अत्यावश्यक सेवा दुकानांचे मालक व त्याकरिता काम करणारे कर्मचारी यांनी शासनाने दिलेल्या निकषानुसार त्यांचे शक्य तितक्या लवकर कोविड लसीकरण करून घ्यावे. ज्या दुकानदारांची दुकाने, बाजारपेठ, मॉल्स, मार्केट बंद राहतील त्या सर्व दुकान धारकांनी, मालकांनी त्यांंच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे.