आमगाव : विधानसभेचा आमगाव मतदार संघ नक्षलग्रस्त भागात असल्याने शासनाने सकाळी ७ ते दुपारी ३ ही मतदानाची वेळ ठेवली होती. नक्षलग्रस्त भागात लोकसभेच्या मतदानाच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे हा लोकशाहीचा खरा विजय आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.आमगाव विधानसभा क्षेत्रातील २१ मतदार केंद्र नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील होते. विधानसभा निवडणुकीला पाहता नक्षलवाद्यांनी घातपात करू नये याची खबरदारी प्रशासनाने घेतली. अत्यंत चाणाक्ष पध्दतीने नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर पोलींग कर्मचाऱ्यांना नेण्यात आले. दुपारी ३ वाजता मतदान संपल्यानंतर पोलीस दलाने त्या कर्मचाऱ्यांना सायंकाळी ६ वाजतापर्यंत तालुकास्तरावर आणले. एकंदरीत शांतता वातावरणात आमगाव विधानसभेच्या प्रत्येक केंद्रावरील मतदान शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडल्याच्या नोंदी नाहीत. सायंकाळपर्यंत नक्षलग्रस्त भागातील काही केंद्रातील कर्मचारी मतपेट्या घेऊन येत होते. आमगाव विधानसभा क्षेत्रात ७० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले. नक्षलवाद्यांनी यावर्षी मतदारावर बहिष्कार टाकल्याचे पत्रके कुठेही आढळल्याची माहिती नाही. गोंदिया पोलिसांनी लोकसभेच्या वेळीच नक्षलग्रस्त भागात गावागावात लायझनिंग पर्सन निर्माण केल्यामुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव आखताच आले नाही. परिणामी नक्षलग्रस्त भागात मतदानात आमगाव विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी उच्चांक गाठला. पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत आमगाव विधानसभा मतदार संघात ६४ टक्के मतदान झाले होते. परंतु आमगाव विधानसभा क्षेत्रात ७० टक्के तर नक्षलग्रस्त भागात ७२ टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्यावेळी नक्षलवाद्यांकडून घातपात केला जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने सर्र्चींग व कोंबीग आॅपरेशन चालविले. सर्व रस्ते, शाळा व निवणुक संबधाने येणाऱ्या सर्व बाबींची कसून तपासणी केली. मोठ्या प्रमाणात पोलीसांना पाचारण करण्यात आले होते. निमलष्करी दलाच्या अनेक कंपन्या मागविण्यात आल्या होत्या. (शहर प्रतिनिधी)
नक्षलग्रस्त भागात उत्साह कायम
By admin | Updated: October 15, 2014 23:19 IST