फुक्कीमेटा येथील प्रकार : शेतकऱ्यांची दयनीय अवस्था सिरपूरबांध : फुक्कीमेटा परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात वाढ व्हावी व आपले जीवनमान उंचविण्याकरिता शेतीला सक्षम करण्यावर भर दिला. या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोअरवेल तयार केल्या व महावितरणकडे रीतसर अर्ज करुन वीज जोडणी घेतली व रबी पिकामध्ये धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु या परिसरात गावाकरिता आणि शेती पंपाकरिता एकत्र डीपी असल्यामुळे त्या डिपीवर अधिक भार होत असून शेतीपंप चालत नाही. मार्च महिना संपत असून सूर्य आग ओकत आहे. रबी पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे धान पिक मरू लागले आहे. शेतकऱ्यांकडून शेती पंपाकरिता स्वतंत्र डिपी तयार करण्यात यावी, अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली. वीज कंपनीतर्फे मागील दीड महिन्यापूर्वी डीपीचे पोल उभे करुन डिपी बसविली. परंतु सदर डिपी शोभेची वस्तू बनून राहीली आहे. शेतकऱ्यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची विचारणा केली असता सदर डिपी एक दोन दिवसात सुरू होईल असे पोकळ आश्वासन देण्यात आले. परंतु आजपर्यंत ती डिपी सुरू करण्यात आली नाही. महावितरणने सदर डिपी तत्काळ सुरू करावी जेणेकरुन शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी वेळेवर मिळेल. सदर समस्येकडे जनप्रतिनिधींनी लक्ष घालून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महावितरणचा फटका बसत आहे शेतकऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 01:34 IST