गोंदिया : मागील वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे व वादळी पावसामुळे केळी या फळपिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील ९५ टक्के झाडे जमीनदोस्त झाले होते. या घटनेला वर्षभराचा कालावधी लोटूनही सदर शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईपासून वंचित आहे.प्राप्त माहितीनुसार, आमगाव तालुक्याच्या सुपलीपार येथील तलाठी साजा-४ अंतर्गत येणाऱ्या गट १६६/१, १७१/१ व १७१/२ या जमिनीवर शेतकरी बेनिराम दयाराम चौधरी, कपुरा बेनिराम चौधरी, प्रवीण चौधरी, सुनिता भाजीपाले, धनिराम भाजीपाले, कमलेश भाजीपाले, तुकाराम, भाजीपाले, तुकाराम चुटे व इतर शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केली होती. मात्र २० ते २३ जुलै २०१४ या कालावधीत अतिवृष्टी व वादळामुळे त्यांनी लागवड केलेल्या केळीच्या झाडांपैकी ९५ टक्के झाडे जमीनदोस्त होवून लक्षावधी रूपयांचे नुकसान झाले होते. याची सूचना त्यांनी कालीमाटी येथील तलाठी कार्यालयास दिली होती. परंतु ४ आॅगस्ट २०१४ पर्यंत मौका चौकशीसाठी कुणीही आले नव्हते, असे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले होते. सदर शेतकरी वर्ष लोटूूनही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देवून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई नाही
By admin | Updated: September 21, 2015 01:44 IST