गोंदिया : जिल्ह्यात दररोज विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. या घटना घडू नये व त्यावर अंकुश लावावा यासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील असला तरी मागील ५ वर्षांचा विचार केल्यास विनयभंग व बलात्काराच्या घटनांचा आलेख वाढतच असल्याने पोलिसांसमोर या घटनांना घेवून एक वेगळे आव्हाण आहे. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण तंटामुक्त जिल्ह्यात जर अशा प्रकारच्या घटना वाढत असतील तर हा एक चिंतेचा विषय पोलिसांसमोर आहे. जिल्ह्यात मागील ५ वर्षांतील गुन्ह्यांच्या आकडेवारींचा विचार केल्यास सर्व प्रकारचे गुन्हे मिळून विनयभंगाच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सन २००९ मध्ये ६७, २०१०- ८०, २०११- ६७, २०१२- ४७, २०१३-९४ व २०१४ मध्ये आतापर्यंत १०६ विनयभंगाच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तर बलात्काराच्या घटनेतही झालेली वाढ चिंतनीय आहे. २००९ मध्ये बलात्काराच्या ३३, २०१० मध्ये २८, २०११-३१, २०१२-३८, २०१३-५१ व २०१४ मध्ये आतापर्यंत ५३ घटना घडल्या. यातील अनेक प्रकरणांना पोलिसांनी उघड केले आहे.एकंदरित विनयभंग व बलात्काराच्या घटनांचा वाढता आलेख हा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लावणारा ठरला आहे. इतर घटनेच्या बाबतीत पोलिसांनी अंकुश लावला असला तरी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले आदी घटनाही घडत असल्याने पोलिसांसमोर जिल्हा गुन्हेगारी प्रवृत्त करणे कठिण झाले आहे.विशेष म्हणजे जिल्हा हा १०० टक्के तंटामुक्त असताना अशाप्रकारच्या सर्वाधिक घटना या ग्रामीण भागात घडत असताना तंटामुक्तीच्या यशावरही आता शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे तंटामुक्त जिल्ह्याचा मान राखणे व महिलांची सुरक्षा असे दुहेरी आव्हाण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात वाढताहेत विनयभंग व बलात्कार
By admin | Updated: December 13, 2014 22:41 IST