नाना पटोले : मोहफुलावरील बंदी हटविण्याचे कार्य अंतिम टप्प्यात केशोरी : मोहफुलावरील बंदी हटविण्यासाठी सहा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्या पाठपुराव्याला नक्कीच येत्या काही दिवसात यश आल्याशिवाय राहणार नाही. मोहफुलावरील बंदी हटविण्याचे कार्य शेवटच्या टप्प्यावर आले आहे. हे झाड या भागातील आदिवासी, गरीब लोकांना कल्पवृक्षासारखे सतत उत्पन्न मिळवून देण्याचे साधन म्हणून ओळखल्या जाते. यापुढे मोहफुल विकणे, साठवूण ठेवणे यावर वनविभागाची कोणतीही अडचण राहणार नाही, असे खासदार नाना पटोले म्हणाले. इळदा येथे ग्रामपंचायत भवनाला सदिच्छा भेटीदरम्यान वृत्तपत्र समुहांच्या प्रतिनिधी व नागरिकांशी ते बोलत होते. तसेच विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे आणि गावातील नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण त्यांनी याप्रसंगी केले. या वेळी खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच निशा धुर्वे, अर्जुनी मोरगाव पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, परिसरातील सरपंच, ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, भविष्यात बहुगुणी वनौपज, निसर्गनिर्मित वनांचा विकास करून पर्यावरणाचे संरक्षण व समतोल टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. मोहफुलापासून औषधी निर्मिती करण्याचे उद्योग निर्माण केले जातील. मोहफुलापासून निर्माण होणाऱ्या टोरीपासून तेल निर्मिती करुन त्यासाठी बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. वनोपज झाडांमध्ये मोहफुलांचा समावेश असून मोहफुलाची जागतिक मागणी वाढविण्याच्या दृष्टीने शरबत, औषधी निर्मितीच्या उद्योग उभारणीवर भर दिला जाईल. सुशिक्षित बेरोजगारांना १०० टक्के सवलतीवर कर्ज उपलब्ध करुन दिला जाईल आणि त्यांना उद्योगधंद्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून ते म्हणाले, त्या योजना सामान्य जनतेपर्यंत तत्काळ कशा पोहोचतील याकडे विशेषतत्वाने लक्ष दिल्या जाईल. खासदार निधीतून इळदा येथील ग्रामपंचायत भवनाचे विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश खंड विकास अधिकारी जमईवार यांना दिले. पीक विमा योजना, जनधन योजना, पंतप्रधान मुद्रा योजनांची सविस्तर माहिती जमलेल्या जनसमुदायाला दिली. केशोरी येथील ग्रामीण रुग्णालय मंजुरीचा प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याची ग्वाही देवून या भागातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राधेशाम धांडे, विजय पाटील गहाणे, मुन्ना लाकडे, विलास बोरकर, चेतन दहीकर, वड्डे महाराज यांनी मांडलेल्या समस्यांवर विचार विनिमय करुन सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकर समस्या मार्गी लावण्याचे त्यांनी आश्वासन दिले. (वार्ताहर)
मोहफुलाचे झाड होणार कल्पवृक्ष
By admin | Updated: April 20, 2017 01:11 IST