मोबाईल बंदीचा फज्जा : जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवासनरेश रहिले - गोंदियासुरक्षीत प्रवास म्हणून एसटीच्या प्रवासाकडे पाहिले जाते. परंतु हल्लीच्या काळात एसटीचा प्रवास सोयीस्कर नाही. कारण एसटीचे चालक वाहन चालवितांना चक्क मोबाईलचा वापर करीत असल्याचे चित्र अनेक बसेसमध्ये दिसून येते. धावत्या बसमध्येही मोबाईलचा वापर होत असल्याने प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.बसमधील चालक व वाहकांना प्रवासादरम्यान मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक बसेसमध्ये वाहक व चालक मोबाईलचा सर्रास वापर करतात. यामुळे एसटीला तोटाही होतो. शिवाय अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन मंडळाने ७ जानेवारी २०१४ रोजी एक आदेश काढून एसटीच्या चालक व वाहकांनी मोबाईल ठेऊ नये असे सांगितले. मात्र या मोबाईल बंदीचा फज्जा जिल्ह्यातील एसटी वाहन चालक करीत आहेत. मोबाईलवर बोलता-बोलता तोल ढासळला तर शेकडो प्रवाशांना प्राणास मुकावे लागेल. ही स्थिती एसटीच्या वाहन चालकांना माहिती असतानाही एसटीचे चालक दोन पैसे कमविण्याच्या नादात चालत्या वाहनातून मोबाईलवर बोलून कारवाई करणाऱ्या पथकाची माहिती एकमेकांना देत असतात. त्यामुळे प्रवाशांकडून पैसे घेऊनही त्यांना तिकीट न देणाऱ्या वाहनचालक व वाहकांना पकडता येत नाही. मोबाईल बंदीचे फर्मान सोडण्यात आले. मात्र याचे पालन वाहक- चालक करीत नाही. एम.एच.०७/ सी.९३६५ या बस मधील चालक आमगाव वरून गोंदियाकडे येत असताना धावत्या बसमध्ये मोबाईलचा वापर करतो. त्यामुळे या बसमध्ये बसणारे प्रवाशी काही वेळासाठी धास्तावलेले होते. धावत्या बसमध्ये मोबाईलचा वापर करून बसमधील शेकडो प्रवाश्यांच्या जीवाशी तो एसटी चालक खेळत होता.
धावत्या बसमध्ये चालक वापरतात मोबाईल
By admin | Updated: November 16, 2014 22:51 IST