गोंदिया : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एस.टी. बसची वाट पाहणार्या प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक ठिकाणी प्रवासी निवार्यांचे बांधकाम करण्यात आले. परंतु या निवार्यांचे बेहाल झाल्यामुळे ते केवळ ‘शो-पिस’ ठरत आहेत. जीर्णावस्थेतील या निवार्यांत घाणीचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी लहान दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसेसची वाट पाहाणार्या प्रवाशांना उघड्यावर उन्हातान्हात तासन्तास उभे राहण्याची पाळी आली आहे.
सन २00६-0७ पासून २0१0 च्या दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात आमदार निधीमधून जवळपास ३२३ पेक्षाअधिक प्रवासी निवार्यांचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु या निवार्यांचा सदुपयोग होत नाही. ज्या उद्देश्यासाठी त्यांचे बांधकाम करण्यात आले, ती उद्देश्यपूर्तीसुद्धा होत नाही.
या निवार्यांना अवैध व्यावसायिकांनी ताब्यात घेतले आहे किंवा तेथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. अनेक वेळा या निवार्यांसमोर मोठय़ा प्रमाणात खासगी वाहने ठेवले जातात. त्यामुळे प्रवाशांना मोठय़ा समस्यांचा सामना करावा लागतो. गर्दी व जीर्ण स्थितीमुळे लोक रस्त्यावरच उभे राहून वाहनांची वाट बघताना दिसून येतात. त्यामुळे अनेकांचा अपघातही होतो.
माहितीनुसार, या प्रवासी निवार्यांचे बांधकाम तर करण्यात आले. परंतु त्यांची देखरेख व स्वच्छतेची जबाबदारी कोणत्याही व्यक्तिविशेषाकडे नसल्याने या निवार्यांत घाणच घाण दिसते. तेथे दुर्गंंधयुक्त वातावरण असल्याने प्रवासी त्या निवार्यांत उभे राहणेसुद्धा पसंत करीत नाहीत.
जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील अनेक गावात तयार करण्यात आलेले प्रत्येक प्रवासी निवार्यासाठी एक ते दोन लाख रुपयांचा खर्च आला. कोटी रुपयांच्या खर्चाने तयार झालेल्या या निवाऱ्यांच्या स्थितीवर प्रवासी नाराजी व्यक्त करतात. प्रवासी निवार्यांच्या इमारतीला भेगा पडून धाराशाई होण्याच्या स्थितीत आहेत. पावसाळ्यात प्रवाशांना पावसात भिजावे लागेल. सदर निवार्यांच्या देखभाल व दुरुस्तीची मागणी जनता करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)