लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. तर बाधितांचा आलेख सातत्याने खालावत असल्याने रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. एकंदरीत जिल्ह्यात बाधितांचे मीटर डाऊन आणि मात करणाऱ्यांचे अप असेच दिलासादायक चित्र आहे. बुधवारी (दि.२८) जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या ७५९ बाधितांनी कोरोनावर मात केली. तर ४७६ नवीन रुग्णांची नोंद झाली. उपचार घेत असलेल्या १४ रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी जिल्ह्यात आढळलेल्या ४७६ बाधितांमध्ये सर्वाधिक १६९ रुग्ण गोंदिया तालुक्यात आहेत. तिरोडा १०६, गोरेगाव २६, आमगाव २६, सालेकसा २८, देवरी ५५, सडक अर्जुनी ४१, अर्जुनी मोरगाव १८ आणि बाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे. मागील चार दिवसात अडीच हजारावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर बाधित रुग्णांची संख्याही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन आणि ब्रेक द चेन च्या कडक निर्बंधामुळे रुग्ण वाढीला जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १३२४७७ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०७१३४ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १३३५९३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११५३७२ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१९१२ कोरोना बाधित आढळले असून यापैकी २५४८० बाधितांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत ५९२२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५८६८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर ७८.६४कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने कमी होत असून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली आहे. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७८.६४ टक्क्यांवर पोहचला आहे. ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढणारयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी नवीन आरटीपीसीआर मशीन दाखल झाली. ही मशीन लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे दररोज २ हजारांवर स्वॅब नमुने तपासणी करण्याचा मार्ग मोकळा होणार असून प्रलंबित नमुने राहण्याची समस्या सुध्दा मार्गी लागणार आहे.