आमगाव : कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना जीव वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देवदूताचा मान देण्यात आला आहे. मात्र, काही आरोग्य कर्मचारी आपला जीव सांभाळत रुग्णांना त्रास विचारूनच औषध लिहून देत असल्याचा प्रकार घडत आहे. असलाच प्रकार बनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आला आहे. येथे लहान बाळांचा चेहराही न बघता फक्त त्रास विचारून त्यांना औषध लिहून देण्याचे कार्य महिला वैद्यकीय अधिकारी करीत असल्याची तक्रार आहे.
कोरोना पुन्हा एकदा फोफावत असून अशात वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या संपर्कात येण्यास टाळत असल्याचे दिसत आहे. असाच प्रकार बनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे. शनिवारी (दि. ६ मार्च) सकाळी १०.३० वाजता वेदांशू प्रदीप चुटे परिवारातील आपल्या नवजात बाळाला घेऊन आरोग्य केंद्रात गेले असता तेथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाची तपासणी तर दूरच मात्र चेहरासुद्धा बघितला नाही व समस्या काय आहे विचारून कागदावर औषधे लिहून दिली. कोरोनाचे सावट असल्याचा बहाना समोर ठेवत वैद्यकीय अधिकारी मोकळे होत आहेत. या प्रकारामुळे आरोग्य केंद्रात येत असलेले रुग्ण नाइलाजाने खाजगी रुग्णालयात पलायन करतात. ११ वाजतादरम्यान आरोग्य केंद्रात जेथे ८ रुग्णांची नोंद झाली होती तेथेच दुसरीकडे खाजगी रुग्णालयात रुग्णांची रांगच रांग लागलेली होती. यावरून आरोग्य केंद्रात उपचार होत नसल्याने नागरिक आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास टाळत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, हे क्षेत्र शेती निगडित व मजुरांचे असल्याने त्यांना उपचारासाठी खर्च करणे परवडणारे नाही. मात्र नाइलाजास्तव त्यांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची सोय व्हावी म्हणून शासनाकडून केला जाणारा हा खर्च मात्र सार्थकी लागत नसल्याचे दिसत आहे. अशात आपली जबाबदारी टाळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.