पाच अटकेत : गौतमनगरातील घटना
गोंदिया : मध्यरात्री घरात शिरून चाकूच्या धाकावर पाच तरूणांनी एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून घरात लुटपाट केली. शहरातील बाजपेयी वॉर्ड गौतमनगर परिसरात ४ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी घटनेतील पाच नराधमांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सविस्तर असे की, शहरातील बाजपेयी वॉर्ड (पोस्टमन चौक), गौतमनगर भागात पीडित महिला (४२) आपल्या मुला-मुलींसोबत राहते. ४ मे रोजी तिचा मुलगा व मुलगी लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील एका गावी लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते.
यामुळे पीडित महिला एकटीच घरी झोपलेली असताना मध्यरात्री १ वाजतादरम्यान दार खटखटल्याने आपली मुले आल्याचा विचार करून पीडित महिलेने दार उघडले. मात्र आरोपी सूरज ऊर्फ स्टिल नूरपती बोरजारे (२०,रा.गौतमनगर) हा हातात चाकू घेऊन घरात शिरला व गप्प बसण्याची धमकी दिली. त्याच्यापाठोपाठ आरोपी अकबर इस्माईल शेख (३२), ओमेंद्र चरणदास टेंभूर्णेकर (३०), मुकेश विनोद तांडेकर (२२) व आकाश दिलीप टेंभेकर (१९,रा.गौतमनगर) हे घरात शिरले. या पाचही नराधमांनी चाकूच्या धाकावर महिलेवर आळीपाळीने अत्याचार केला. एवढेच नाही तर घरातील आलमारीत ठेवलेले तीन हजार रूपये घेऊन कुणालाही न सांगण्याची धमकी देत निघून गेले. सोमवारी (दि.५) तिचा मुलगा-मुलगी बाहेरगावाहून परत आल्यावर तिने आपबिती सांगितली. दरम्यान तिने रात्री १२.३० वाजतादरम्यान शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या आधारे भादंविच्या कलम ३७६ (ड),३९५, ३२३, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी दोन पोलीस पथक तयार करून आरोपींची शोधमोहीम सुरू केली. मंगळवारी पहाटे ५ वाजतापर्यंत पोलिसांनी पाचही नराधमांना शहरातील विविध भागांतून पकडले. त्यांचे कपडे व चाकू जप्त झालेला नसून लुटलेले तीन हजार रूपये आरोपींनी दारू पार्टीत उडवून टाकले होते. यातील सूरज बोरजारे हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून अन्य आरोपींचा रिकॉर्ड तपासला जात आहे. या पाचही नराधमांना न्यायालयात हजरे केले असता त्यांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात शहरातील छोटा गोंदिया परिसरात असाच प्रकार घडला होता.