सौंदड/रेल्वे : सडक/अर्जुनी तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे यावर्षीही १ जानेवारीपासून दोन दिवसीय ‘मामा-भाचा’ यात्रेला सुरूवात होत आहे. मामाभाचा देवस्थान कमिटीच्या वतीने दरवर्षी या यात्रेचे आयोजन केले जाते. अनेक वर्षापूर्वी देवस्थानाच्या जागेवर शेजारी-शेजारी उभ्या दोन साजा (येन प्रजातीची दोन उंच झाडे) नागरिकांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी त्याला मामा-भाचा असे नामकरण केले. यातील मोठे झाड म्हणजे मामा व लहान झाड भाच्याचे प्रतिक म्हणून परिसरात ओळखले जाऊ लागले. ही झाडे नागरिकांचे श्रध्दास्थान बनले.या देवस्थानाच्या मदतीकरिता दरवर्षी देवस्थान कमिटी व परिसरातील गिरोला, हेटी, सातलवाडा व खोडशिवनी येथील ग्रामस्थांनी ८ ते १० वर्षापूर्वी मामा-भाचा यात्रेला सुरूवात केली. या यात्रेला दुरदुरवरून हजारो भाविक हजेरी लावतात. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे हे देवस्थान दुर्लक्षित आहे. दि.१ व २ अशा दोन दिवसीय यात्रेला गुरूवारी सुरूवात होत आहे. यानिमित्त नवयुवक बाल नाट्य मंडळ गिरोलाच्या वतीने ‘कोण वाली गरीबाचा’, तसेच न्यु झाडीपट्टी नाट्यमंडळाच्या सौजन्याने ‘रुसला पदर मायेचा’ या नाट्यप्रयोगांचे आयोजन केले आहे. (वार्ताहर)
गिरोला येथील आजपासून मामा-भाचा यात्रा
By admin | Updated: December 31, 2014 23:26 IST