लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंडीपार ते गोंडमोहाळी व गंगाझरी ते धापेवाडा हे सध्या इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांवर घनदाट लोकवस्तीची गावे असून रहदारी जास्त आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या दिवसभर चालतात. या मार्गावरील गावांना मुख्य शहरांसह जोडण्यासाठी हेच एकमेव मार्ग असल्यामुळे सदर मार्गांना राज्यमार्गांमध्ये परिवर्तीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, मुंडीपार राज्यमार्ग-२४९ पासून भानपूर, खातीटोला, वळद, दवनीवाडा, बोदा, गोंडमोहाळी राज्य मार्गापर्यंत व गंगाझरी राज्य मार्गापासून खळबंदा, खातीटोला, वळद, दवनीवाडा, धापेवाडा राज्य मार्गापर्यंत सदर इतर जिल्हा मार्गांना परिवर्तीत करण्याबाबत लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले होते. लोकहितासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सभेत सदर विषय मांडून ठराव पारित करून क्षेत्राच्या विकासासाठी शासनाला पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.सदर दोन्ही मार्गांवरून ४० वर्षांपासून एसटीच्या बसेस धावतात. तसेच दोन्ही मार्गांचीलांबी २० किमी व १५ किमी एवढी आहे. पहिला रस्ता दवनीवाडा-तिरोडा असा असून गोंदिया-गंगाझरी-तिरोडा या मार्गावर लोहमार्ग आडवा येतो.सदर मार्ग अनेकदा ब्लॉक होतो. त्यामुळे गोंदिया-मुंडीपार-दवनीवाडा-तिरोडा या मार्गाने दळणवळण केली जाते. दुसरा रस्ता गंगाझरी-दवनीवाडा-धापेवाडा असा आहे. धापेवाडा व इतर गावात वैनगंगा नदीचा पूर शिरतो. त्यामुळे नवेगाव, धापेवाडा, महालगाव, मुरदाडा, गोंडमोहाळी अंतर्गत असलेला मार्ग पुरात बुडून जातो. कधीकधी आठ-आठ दिवस पूर आपले रौद्र रूप धारण करतो. अशावेळी तिरोडा-गोंडमोहाळी-दवनीवाडा-मुंडीपार गोंदिया या मार्गाने दळणवळण सुरू असल्याने त्या काळात अनेक दुर्घटना होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. ही दरवर्षीची समस्या आहे. या प्रकारामुळे सदर दोन्ही मार्गांना राज्य मार्गामध्ये परिवर्तीत करून नागरिकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे.इतर क्षेत्रात वळविला जातो निधीदवनीवाडा अंतर्गत ६३ गावे मिळून दवनीवाडा तालुका व पंचायत समिती निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन आहे. पं.स. गोंदिया येथे २८ सदस्य व पं.स. तिरोडा येथे १४ सदस्य आहेत. दोन्ही पंचायत समित्यांमध्ये दवनीवाडा क्षेत्रातून व लगतच्या क्षेत्रातून अर्ध्याधिक पं.स. सदस्य लोकसंख्येच्या प्रमाणात निवडून जातात. मात्र अशा प्रदेशातून जाणारे मार्ग शासनाने अति कनिष्ठ विभागात घातलेले आहेत. या क्षेत्राच्या विकासासाठी ज्या प्रमाणात निधी खर्च होणे अपेक्षित आहे, त्या प्रमाणात होत नाही. अधिकार व दबाव तंत्राचा वापर करून निधी इतर क्षेत्रात वळता केला जातो, असा आरोप आहे. या क्षेत्रातील जनता अन्न व दुष्काळामुळे त्रस्त नसून रस्त्यांच्या दयनिय अवस्थांमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे या मार्गांना राज्यमार्ग बनविण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्हा मार्गांना राज्यमार्ग बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:31 IST
मुंडीपार ते गोंडमोहाळी व गंगाझरी ते धापेवाडा हे सध्या इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांवर घनदाट लोकवस्तीची गावे असून रहदारी जास्त आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या दिवसभर चालतात.
जिल्हा मार्गांना राज्यमार्ग बनवा
ठळक मुद्देनागरिकांची मागणी : गैरसोयींमुळे दळणवळण करण्यास अडचण