गोंदिया : गुरूवारी (दि.२७) मध्यरात्री जिल्ह्यात बरसलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीला सुमारे २१ लाखांचा फटका बसला आहे. यात गोंदिया व देवरी विभागातील वीज वाहिन्या तुटल्या असून पोलही पडले आहेत.वादळी वाऱ्यामुळे गोंदिया विभागातील गोरेगाव येथे सुमारे पाच लाखांचे तर तिरोडात चार लाखांचे नुकसान झाले आहे. तर ग्रामीण गोंदियात सर्वाधीक सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे. यात गोंदिया विभागात १.६८ किमी. उच्चदाब वाहिन्या तर ५.३५ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या आहेत. तर देवरी विभागात ०.४२ किमी. उच्चदाब वाहिन्या व १.३२ किमी. लघुदाब वाहिन्या तुटल्या. त्यामुळे देवरी विभागात सुमारे २.६७ लाखांचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे ३३ केव्ही लाईन्स जवळजवळ सर्वच दुरूस्त करून सुरू झाल्या आहेत. तर गोरेगावमधील ११ केव्ही.च्या दोन लाईन्सचे काम सुरू होते. अशाप्रकारे जिल्ह्यात सुमारे २०.६७ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)विजेचे १०५ खांब पडले वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील वीज पोल मोठ्या प्रमाणात पडले असून त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या निर्माण झाली होती. यात गोंदिया विभागात २४ उच्चदाब वाहिन्यांचे तर ६५ लघुदाब वाहिन्यांचे पोल असल्याची माहिती आहे. शिवाय देवरी विभागात आमगाव येथे एक उच्चदाब वाहिनी व सुमारे १२ लघुदाब वाहिन्यांचे पोल तुटले. विशेष म्हणजे तिरोडा तालुक्यातील मंगेझरी व बरबसपुरा येथे मोठ्या प्रमाणात पोल पडल्याने गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यासाठी जोमात काम सुरू असल्याचेही कळले.
महावितरणचे २१ लाखांचे नुकसान
By admin | Updated: April 29, 2016 01:46 IST