गोंदिया : सुख-दु:खात मित्र साथ देतो असे म्हटले जाते. परंतु सद्यस्थितीत गोंदिया शहराची परिस्थिती विपरीत आहे. रामनगरच्या चार मित्रांनी एका मित्राच्या ४० हजाराच्या मोबाईलवर डोळा ठेवून कट रचून त्याच्याजवळून मोबाईल लुटल्याची घटना सोमवारच्या दुपारी रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत योणऱ्या एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयामागील परिसरात घडली. या प्रकरणाचा छडा रामनगर पोलिसांनी फक्त साडेतीन तासात लावला. या तपासात पोलिसांना ‘यार ने ही लूट लिया घर यार का’ ही बाब उघडकीस आली.रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरातील पार्थ नेवारे (१५) या आपल्या मित्रालाच गंडवून त्याचा महागडा मोबाईल विकून पैसे आपल्या मौजमस्तीवर उडवायचा असे लक्षात आले. पार्थने एका महिन्यापूर्वी ४० हजार रूपयाचे मोबाईल विकत घेतले. पार्थ वडील नाहीत. आई शिक्षिका आहे. पार्थ एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या हट्टाहासापायी त्याच्या आईने त्या ४० हजाराचे मोबाईल विकत घेऊन दिले. महिनाभर तो मोबाईल वापरत असल्याने त्याच्या मित्रांची नजर त्या मोबाईलवर होती. त्याचा मोबाईल नेऊन आपल्या मौजमस्तीच्या शौक पुर्ण करण्यासाठी त्यांनी कट रचला. चार मित्रांनी त्याला गंडविण्यासाठी हा कट रचला. या चार आरोपींपैकी तिघे अल्पवयीन आहेत. तर एक २० वर्षाचा आहे. पार्थ सोमवारी दुपारी आपल्या घरी असताना त्याचे दोघे मित्र त्याच्या घरी आले. त्यांनी पार्थला फिरायला चल म्हणून मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील भागात असलेल्या जंगलात नेले. पार्थ सोबत जाणाऱ्या दोन्ही मित्रांनी आपण कुठे आहोत याची माहिती एसएमएसच्या माध्यामातून इतर दान मित्रांना दिली. या एसएमएसच्या आधारावर दोघेही तोंडाला काळा कापड बांधून तिथे आले. त्या दोघांनी पार्थला व त्याच्या सोबत असलेल्याना मारहाण केली व तिघांचे मोबाईल घेऊन गेले. यासाठी त्यांनी दोन मोटारसायकलचा वापर केला. ते दोघे या तिघांना मारहाण करीत त्याच्या मानेवर ब्लेड लावून मोबाईल हिसकावला. पार्थ तेथून कसाबसा आपला बचाव करीत पळत सुटला तर या प्रकरणात समाविष्ट असलेले दोघे तिथेच बसून राहीले. यातूनच या प्रकरणाचे बिंग फुटले. या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ६.२० वाजता दरम्यान दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या मित्रांवर संशय आला. त्यांचे मोबाईल पुन्हा त्यांच्याच हातात आले. त्या मोबाईलची पाहणी केल्यावर त्यात त्या दोन आरोपी मित्रांना एसएमएस केल्याचे लक्षात आले. अवघ्या साडे तीन तासात गुन्हा उघडकीस आला. या प्रकरणातील तीन जण बाल आरोपी आहेत, तर एक २० वर्षाचा आहे. रूपेश उर्फ कल्लू गणेश शहारे (२०) रा. गणेशनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींनी वापरलेल्या मोटार सायकल वरील क्रमांक यापुर्वीच काढले होते. हा गुन्हा घडविण्यासाठी त्यांनी आपल्या मोटार सायकलवरील क्रमांक काढून टाकले. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी एक लाख १० हजाराचा माल जप्त केला आहे. सदर घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३९४,५०६, ३४, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक शशीकुमार मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहायक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक फौजदार भीमसिंग चंदेल, हवालदार जगनाडे, रहांगडाले, मोरे, राजू मिश्रा, पोलीस नायक देसाई, उईके, कुर्वे, शिपाई बुध्दे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अल्पवयीन मित्रांनीच लुटले
By admin | Updated: October 7, 2014 23:35 IST