गोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम घाटटेमनीवासीयांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जगत हायस्कूल मध्ये सुरू असलेले ५ ते ७ पर्यंतचे वर्ग बंद करण्याच्या मागणीसाठी २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले होते. तर जिल्हा परिषद शिक्षण सभापतींच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. गावातील जगत हायस्कूल प्रशासनाने शासनाची दिशाभूल करून ५ ते ७ वीचे वर्ग सुरू करण्याची मंजूरी मिळविली होती. यामुळे मात्र जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होऊन तुकडी तुटण्याची व शिक्षक अतिरीक्त होण्याची पाळी आली होती. यावर सरपंच रोशन मरसकोल्हे व गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचका दाखल केली होती. त्यावर जगत हायस्कूल मधील ५ ते ७ पर्यंतचे वर्ग रद्द करण्याचा निर्णय सुनावण्यात आला होता. मात्र असे असतानाही शाळेतील वर्ग सुरूच होते. यावर सरपंच मरसकोल्हे व गावकऱ्यांनी वर्ग त्वरीत बंद करण्याची मागणी करीत २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले होते. याबाबत माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी सयाम यांनी घटनास्थळ गाठून प्रकाराबाबत वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एवढ्यावर गावकऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती मदन पटले यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्रकार कळविला. यावर पटले यांनी प्रकरणावर त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे प्रकरणी त्वरीत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन झेडण्याचा व जगत हायस्कूलच्या मुख्याध्यापकां विरूद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिल्याचे सरपंच रोशन मरसकोल्हे, ग्राम पंचायत सदस्य शिवचरण ब्राम्हणकर, देवेंद्र ढोरे, संजय डोये, रमेश डोये, सेवक डोये व गावकऱ्यांनी पत्रकातून कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळेला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप
By admin | Updated: November 25, 2014 22:58 IST