कचराकुंड्यांना सुटली दुर्गंधी, नागरिक त्रस्त
गोरेगाव : शहरात ठिकठिकाणी असलेल्या कचराकुंड्यांना दुर्गंधी सुटल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत कचराकुंड्या उभारल्या आहेत.
राइस मील ठरत आहेत धोकादायक
गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राइस मीलमुळे वाहन चालकांच्या डोळ्यात धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यात कचरा जाऊन वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता असते. रस्त्यावरील राइस मील बंद करण्याची मागणी होत आहे.
गौण खनीज चोरीकडे दुर्लक्ष
गोरेगाव : महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे, परंतु महसूल विभाग केवळ रेती तस्करांच्या मागावर असतात. त्यामुळे मुरुम, दगड चोरट्यांना रान मोकळे असल्याचे दिसून येत आहे.
नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी
अर्जुनी-मोरगाव : सांडपाण्याचा निचरा होत नाही, पण अजूनही नगरपंचायत प्रशासनाचे नाली स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. नाल्या केरकचऱ्याने भरल्या आहेत. त्यातून सांडपाण्याचा निचरा होत नाही. नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी आहे. नगरपंचायत प्रशासन आणि नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
गोंदिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई होत नाही. ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त
गोंदिया : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे डासांचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. हिवतापासारख्या आजाराची शक्यता आहे.
फाइव्ह-जीकडे वाटचाल, मात्र सेवा ‘थ्री जी’तच!
गोंदिया : अँड्रॉइड मोबाइल हा सध्याच्या काळात जीवनावश्यक घटक बनला असून, मोबाइलशिवाय व्यक्ती जगणे कठीणच झाले आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता पुढे मोबाइलचे स्पीड अधिक होणार, अधिक सुविधा मिळणार, म्हणजे मोबाइल कंपन्यांची ‘फाइव्ह-जी’कडे वाटचाल सुरू असून, ही सेवा लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र, सध्या थ्री-जी, फोर-जीचे स्पीड व्यवस्थित मिळत नाही. तेव्हा फाइव्ह-जी चे काय, थ्री-जीतच रुतलेले चाक अजूनपर्यंत पुढे जात नाही. ग्राहकांना मोबाइलचे नेटवर्क धड मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
रस्ते डांबरीकरणाविना
गोंदिया : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्त्यांचे बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी पावसाने रस्त्यांची वाट लावली होती.
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
निराधारांचे अनुदान त्वरित द्या
शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील ३-४ महिन्यांपासून खात्यात अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिककोंडी होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वारंवार वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त
गोंदिया : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कायम कोंडी असते. लांबच लांब रांगा लागत असल्याने, शहरातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग पार करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात
गोंदिया : जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून, शेतात जाण्या-येण्याचे मार्गही बंद झाले आहेत. अनेक तलावांचे आकारमान कमी होत असल्याने साठवण क्षमताही घटत आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे.
कव्हरेजअभावी भ्रमणध्वनीसेवा ठप्प
गोंदिया : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त झालेले असून, अनेकांनी नवीन कंपनींचा सिम कार्ड खरेदीला पसंती दिली आहे.
जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू
गोंदिया : वनसंपदेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यातील वनांमध्ये मोठ्या प्रमाणात वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट असल्याचे दिसून येते. वनतस्करांनी वनविभागाचे वनांकडे दुर्लक्ष असल्याने वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे.
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
गोंदिया : व्यापारी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे, ग्राहक, व्यापाऱ्यांची कुचंबणा होत आहे. सातत्याने हा प्रश्न उपस्थित होत असताना प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसते.