शेतकरी पुन्हा हवालदिल : लवकर निघणाऱ्या वाणाचे उत्पन्न घटणार? देवानंद शहारे ल्ल गोंदिया परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागाला चांगले झोडपल्यामुळे दाणे भरत आलेल्या हलक्या धानाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हलक्या जातीच्या धानाला पाऊस नुकसानदायक असताना जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस आला. त्यामुळे उताऱ्यात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. २० सप्टेंबरनंतर आलेल्या पावसामुळे हलक्या धानाला मोठे नुकसान होईल, असे शेतकरी सांगत आहेत. तर दुसरीकडे हलका धान भरलेला नसल्याने त्याचे काहीही नुकसान होणार नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यात प्रत्यक्ष शेतावर राबणारा शेतकरी व कार्यालयातून अंदाज बांधणारे अधिकारी यांच्या सांगण्यात मात्र मोठीच विसंगती दिसून येत आहे. पण भारी धानाला या पावसामुळे काहीही नुकसान नसून फायदाच होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्या डोळ्यात आसू अशी स्थिती आहे. सध्याचे हवामान ढगाळ व थंड वातावरण असून समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात १०० टक्के रोवणी पूर्ण झालेली आहे. जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्य १२७४.७ मिमी असून, २० सप्टेंबर २०१६ अखेर ९६२.७ मिमी पाऊस झालेला आहे. तो सरासरीच्या ७५.५ टक्के आहे. यावर्षी १७९४५.५ हेक्कर क्षेत्रावर भात नर्सरी टाकण्यात आली. त्यानुसार एकूण एक लाख ८८ हजार ६४२.६० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड झालेली आहे. ती सरासरीच्या १०६ टक्के आहे. भात पिकाची रोवणी पूर्ण झालेली आहे. मात्र धानपिकावरील रोग व किडी यामुळे शेतकरी वैतागून गेले आहे. २० सप्टेंबरपूर्वी धानपिकावर अनेक ठिकाणी कीड व अळी लागली होती. मात्र त्या कालावधीत हलक्या धानाला एका पावसाची गरज होती व पाऊसही आले. त्यामुळे कीड व अळ्या धुवून निघाल्याने त्यांचे प्रमाण घटले होते व शेतकरी सुखावले होते. मात्र आताच्या पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवित आहेत. ८० टक्के या प्रमाणात भातपिकावर किडी व ०.०९ टक्के या अत्यल्प प्रमाणात पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) पीक विम्याच्या लाभासाठी त्वरित कळवा ४ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास तशी माहिती त्वरित कृषी किंवा महसूल विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना द्यावी. त्यांच्याकडून त्वरित पंचनामा करून वरिष्ठांना सादर करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात नापेर राहिलेले क्षेत्र ४कृषी विभागाच्या माहितीनुसार, अर्जुनी-मोरगाव तालुक्यामधील १६ गावांतील ५८.३८ हेक्टर (शेतकरी संख्या १२१) व तिरोडा तालुक्यात ३० गावांचे ७०८.३३ हेक्टर क्षेत्र नापेर राहिलेले आहे. जिल्ह्याच्या एकूण ४६ गावांचे ७६६.७१ हेक्टर क्षेत्र नापेर राहिलेले आहे. लवकर निघणारे वाण गर्भ व लोंबी निघण्याच्या अवस्थेत असून मध्यम व उशिरा येणारे वाण फुटवे व वाढीच्या अवस्थेत आहेत. नत्राचा दुसरा हप्ता देणे सुरू असून बांधीतील पाण्याची पातळी २.५ सेंमी इतकी ठेवून निंदणाचे काम सुरू आहे. तूर वाढीच्या तर तीळ फुले धरण्याच्या अवस्थेत ४ तूर : बंधाऱ्याच्याच्या तूर पिकाची ६९५४.१ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झालेली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या ११५ टक्के झालेली आहे. सध्या तूरपीक वाढीच्या अवस्थेत आहे. ४तीळ : तिळाचे सर्वसाधारण क्षेत्र १२७६ हेक्टर असून८५३.६ हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झालेली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या ६७ टक्के आहे. सध्या तीळ फुले धरण्याच्या अवस्थेत आहे. १६७५ किलो उताऱ्याचा अंदाज ४जिल्ह्यात बागायती व जिरायती मिळून सरासरी १६७५ किलो प्रतिहेक्टर धानाचा उतारा होईल, असा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कृषी आयुक्तालयास मागील महिन्यात पाठविले होते. मात्र २४, २५ व २६ सप्टेंबर रोजी आलेल्या पावसाने हलक्या जातीचे उत्पन्न कमी होणार असल्याने सदर उताऱ्यात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी अतिवृष्टी व दमदार पावसाने पिकांना झोपवून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडून पुन्हा नाराजीचे सूर ऐकू येत आहेत.
हलक्या धानाला बसला फटका
By admin | Updated: September 27, 2016 02:44 IST