तरूणांचा उपक्रम : स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूबाराभाटी : येथून एक किमी अंतरावर येरंडी-देव या गावातील काही निवडक तरुणांनी स्पर्धा परीक्षांची जय्यत तयारी करण्याच्या हेतूने लोकवर्गणी गोळा करून समाज मंदिरात राजगृह नावाचा ग्रंथालय उघडला. गावातील तरूणांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर वाचन वर्गाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी एमपीएससीची (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा नुकतेच पास झालेले ठाणेचे तहसीलदार शिवपुते मार्गदर्शक म्हणून होते. तसेच आतिथी म्हणून दिलवर रामटेके, रत्नदीप दहिवले, वडेगावचे केंद्रप्रमुख कृपाल बोरकर, दीपक तागडे तसेच गावातील पदाधिकारी आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते. येरंडी/देव हे गाव शैक्षणिकदृष्ट्या अतिशय समोर आहे. या गावातील व्यक्ती जिल्हाधिकारीपासून तर शिपाईपर्यंत सर्वच विभागातील नोकरवर्ग म्हणून कार्य करीत आहेत. येथील ९० टक्के नागरिक शिक्षित आहेत. या सर्व बाबींचा एक आराखडा बांधून या गावातील तरूणांनी स्पर्धा परीक्षांची तयारी उत्कृष्ट व्हावी म्हणून लोकवर्गणीच्या माध्यमातून चक्क ग्रंथालय उघडला आहे. सदर राजगृह नावाचे ग्रंथालय आंबेडकर चौकात स्थापन करण्यात आले आहे. या ग्रंथालयामध्ये यूपीएससी, एमपीएससी, एसटीआय, पीएसआय, बँक पीओ, तलाठी, शिपाई, रेल्वे, कृषी, पशु संवर्धन विभाग, ग्रामसेवक, परिचर, लिपीक अशा अनेक पदांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी तरूणवर्ग करीत आहे. विविध प्रशासकीय विभागात नोकरी मिळावी म्हणून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सदर राजगृह ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे, असे शिवपुते यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले.ग्रंथालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी व उपक्रम राबविण्यासाठी भूपाल गेडाम, मयूर खोब्रागडे, प्रशीक तागडे, अश्वदीप मोटघरे, आशिक खोब्र्नागडे, अमित रंगारी, सोमदास बोरकर, चेतन नंदागवळी, सचिन कांबळे, मोनू तागडे, निकेश बोरकर आदी तरुण प्रयत्नशील आहेत.(वार्ताहर)
लोकवर्गणीतून उघडले राजगृह ग्रंथालय
By admin | Updated: July 13, 2015 01:32 IST