पानगाव येथील घटना : गावासह परिसरात दहशतीचे वातावरणसाखरीटोला : परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्याने येथून दोन किमी. अंतरावरील पानगाव (रामपूर) येथे बकरी ठार केली. शनिवारी (दि.१७) रात्री घडलेल्या या घटनेमुळे मात्र गावासह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, ओमप्रकाश चन्ने यांच्या गोठ्यात चार बकऱ्या बांधलेल्या होत्या. व गोठ्याला मागील व समोरील भागात लाकडी फाटकाला दोराने बांधले होते. बिबट्याने फाटकाची दोरी दातांनी कुरतडून फाटक तोडून आत प्रवेश केला व बकऱ्यांवर हल्ला चढविला. यात एक बकरी व पिलू ठार झाले. ठार केलेल्या बकरीचा अर्धा भाग तेथेच खाऊन दोन पाय व मुंडके जागेवर सोडून बीबट पसार झाला. बकरीचे पिलूू मात्र खाऊन फस्त केले असावे असा अंदाज आहे.सदर घटना चन्ने यांना सकाळी लक्षात आली. बिबट्याचे पंजे घटनास्थळी उमटल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांनी लगेच बिटचे वनरक्षक एच.के. एरणे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. चन्ने यांच्या घराच्या मागच्या बाजूला वनविभागाची जमीन व मोकळी जागा आहे. त्यानंतर कवडी व वडद या गावाशेजारील जंगलात सदर बिबट फिरत असतो. मांडोदेवीचे जंगल लागूनच असल्याने मागील काही दिवसापासून येरमडा, कवडी, वडद, पानगाव या गावांच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती आहे. यापूर्वी बिबट्याने जनावरांवर हल्ले केले होते. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या या हल्यात मात्र चन्ने यांचे १० हजार रूपयांचे नुकसान झाले असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.
बिबट्याने केली बकरी ठार
By admin | Updated: October 19, 2015 02:06 IST