गोंदिया : राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस कहर करीत असून, झपाट्याने वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येमुळे शासनही धास्तीत आले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता कठोर निर्बंध व लॉकडाऊनचे शस्त्र उपसण्यात आले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण करण्यास सांगितले जात आहे. त्यानुसार शासनाने ४५ वर्षांवरील वयोगटातील प्रत्येकाचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातही कोरोना लसीकरणाला गती देण्यात आली असून रविवारी सुटीच्या दिवशीही लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (दि.५) शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांत १०६६५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात विशेष बाब अशी की, जिल्ह्यात लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांना सर्वांना मागे सोडत आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे. सोमवारपर्यंत तब्बल ४४८३१ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाल्याचे दिसून येत आहे. तर त्यानंतर ४५ ते ६० वर्षे वयोगट असून यातील २८२४१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
---------------------------------
- लसीकरण केंद्र - १४०
- हेल्थकेअर वर्कर - १३९६४
- फ्रंटलाईन वर्कर - १९६२२
- ज्येष्ठ नागरिक- ४४३८१
- ४५ वयापेक्षा जास्त - २८२४१
--------------------------
- पहिला डोस घेतलेले एकूण - ९५३७१
- दुसरा डोस घेतलेले एकूण - ११२८७
----------------------------
ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण जास्त
जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला असून सोमवारपर्यंत १०६६५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ग्रामीण भागात लसीकरणाला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर ८१६११ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर शहरी भागातील शासकीय लसीकरण केंद्र व खासगी केंद्रांना मिळून २५०४७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावरून ग्रामीण भागातील नागरिक आता कोरोना लसीकरणाला घेऊन अधिक जागरूक असल्याचे दिसत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
------------------------------
केटीएस रुग्णालयात सर्वाधिक लसीकरण
जिल्ह्यात १४० केंद्रांवर लसीकरण केले जात असून यामध्ये खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. असे असले तरीही जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण येथील कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालयात झाले आहे. येथे ९६७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ७७७६ नागरिकांना पहिला तर १८९४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
----------------------------------
कोट
कोरोनाचा वाढता उद्रेक बघता आता नागरिक लसीकरणासाठी सरसावत आहेत.यामुळे आता लसीकरणाला वेग आला असून सुटीच्या दिवशीही लसीकरण केले जात आहे. यामुळे नागरिकांना आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन लसीकरण करवून घ्यावे.
- डॉ. नितीन कापसे
जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.