स्वच्छतेची शपथ : अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी झाडले रस्तेदेवरी : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद गोंदिया तथा पंचायत समिती देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी (दि.२०) स्वच्छता मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अधिकारीवर्ग उपस्थित होता. सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेण्यासोबत हातात झाडू घेऊन रस्ते साफ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वच्छता मेळावा व स्वच्छ ग्राम योजनेचा शुभारंभ देवरीतून करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. शिंदे यांच्या हस्ते, विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मदन पटले, सभापती सविता पुराम, मोरेश्वर कटरे, प्रकाश गहाणे, कुशन घासले, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.सदस्यगण राजेश चांदेवार, जागेश्वर धनबाते, रिनाताई रहांगडाले, योगेंद्र भगत, भूपेंद्र नाचगाये, सविता पुराम, उषा हर्षे, रामकृष्ण राऊत, नागपुरे, पारबताबाई चांदेवार, कृष्णा कटरे, अतिरिक्त कार्यपालन अधिकारी निरंतर पाळवी, जिल्हा कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, सभापती कामेश्वर निकोडे, मंचावर उपस्थित होते.यावेळी स्वच्छतेचे महत्व सांगताना जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर म्हणाले, देशात आरोग्यावर मोठा खर्च केला जातो. आरोग्याच्या समस्येचे मूळ अस्वच्छतेत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सीईओ शिंदे म्हणाले की, एकीकडे राज्यात गोंदिया जिल्हा प्रगतीपथावर असताना दुसरीकडे सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये ३५० शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यामधील काही वापराअभावी मोडकळीस आलेली आहेत. आता शाळांमधील शौचालयास कुलूप आढळल्यास मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली जाईल. गावातील स्वच्छता ठेवण्यासाठी ग्रामपंचायतने अतिरिक्त स्वच्छता कर लावावा, जेणेकरून लोकांना स्वच्छतेची सवय लागेल असेही ते म्हणाले.स्वच्छतेवर सर्व जि.प.सदस्यांनी आपले विचार मांडले. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, कृषी आरोग्य व वनविभाग, ल.पा., ग्रामपंचायत, बी.आर.सी., पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक राजेश उफाळकर यांनी, संचालन दिशा मेश्राम तर आभार खंडविकास अधिकारी मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमानंतर जि.प.च्या सर्व सदस्यांनी व मुख्य कार्यपालन अधिकारी शिंदे यांनी शहरातील मुख्य चौकातील ठिकाणी हातात झाडू घेवून रस्त्यांची सफाई केली. नियोजित उद्घाटक अमित सैनीची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. (प्रतिनिधी)
स्वच्छता मेळाव्यांची सुरुवात
By admin | Updated: November 20, 2014 22:53 IST