गोंदिया : आम्ही सामान्यजणांच्या अडचणी समजून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न असो किंवा पुरामुळे खालच्या पुलांना उंच करण्याची बाब असो, ते सर्व प्रश्न आम्ही सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी विचारतात की रस्ते बनविल्याने विकास होतो काय? सिंचन योजना पूर्ण न होण्याचा आरोप ते करतात. तर काय एकाच रात्रीत मोठमोठे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जातात काय? विरोधकांंकडे विकासाची कसलीही संकल्पना नाही, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी करून विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील लोधीटोला (सावरी), गर्रा खुर्द, गर्रा बु., रावणवाडी, गोंडीटोला, मुरपार, सिरपूर, सिरपूरटोला, मोगर्रा, चारगाव, अर्जुनी येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी पदयात्रा काढून जनसंपर्क अभियान राबविण्यात आले. घरोघरी जावून नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी अग्रवाल यांनी आपले मत व्यक्त केले. ते विरोधी पक्षांवर आगपाखड करताना पुढे म्हणाले की, सध्याचे भाजपचे उमेदवार हे गोरेगाव तालुक्यातील मोहाडी जि.प. क्षेत्राचे सदस्य आहेत. या क्षेत्रात कटंगी सिंचन प्रकल्पाचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. तेथील पुनर्वसनाची समस्या प्रलंबित आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रातील नागरिकांसाठी काय केले व काय करणार गोंदियाच्या जनतेसाठी? त्यांना केवळ आरोप करणेच जमते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे काम केवळ आरोप लावणे व अफवा पसरविणे, एवढेच आहे. ते प्रत्यक्षपणे कसलेही जनहिताचे काम करीत नाही. सन १९९५ ते १९९९ पर्यंत राज्यात भाजप-शिवसेनचे शासन होते. त्यावेळी गोंदिया तालुक्यात काहीतरी चांगले कार्य झाले असेल तर सांगावे. भाजप-शिवसेनेने या तालुक्यात एकही जनहिताचे काम केले नाही. माझ्यावर टिकाटिप्पनी न करता त्यांनी एवढेच सांगावे की, ते गोंदिया कोणते विकासाचे कार्यक्रम राबविणार आहेत? गोंदियाच्या विकासासाठी त्यांचे काय नियोजन आहे? नेत्यांच्या नावावर एकदा भाजपने विजय मिळविले. मात्र नेहमीच हे शक्य नाही. विरोधकांना आपली योग्यता दाखवावी लागेल. जनता यांना योग्यप्रकारे ओळखते. केंद्रासाठी खासदार निवडीचे मुद्दे वेगळे आहेत. परंतु आमदाराची निवड सामान्य माणसाचीच करावी लागेल. जो आमच्यामधील नसून ५० किमी दूरवरील गोरेगाव तालुक्याचा आहे, त्याची निवड कशी करणार? आमदार हा सामान्य माणसाजवळील असावा आणि हे संबंध मी प्रामाणितेने निभवले आहे. या क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी आपली जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, मी आपल्या मतदानाच्या योग्य आहे, असे अग्रवाल म्हणाले. यानंतर माजी जि.प . सदस्य ओमप्रकाश भक्तवर्ती यांनी भारतीय जनता पक्षाचा चांगलाच समाचार घेवून पंजा चिन्हाची बटन दाबून गोपालदास अग्रवाल यांना विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हा काँग्रेस सचिव गेंदलाल शरणागत यांनी, गोंदिया तालुक्यात एक लाख २५ हजार पेक्षा अधिक गरजूंना लाभदायी योजनांचा लाभ आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश रहमतकर, पं.स. सभापती सरिता अंबुले, उपसभापती चमन बिसेन, माजी उपसभापती मनिष मेश्राम, सावरीचे सरपंच चिखलोंडे, माजी सरपंच टेकचंद सिहारे, राधेश्याम गजभिये, जयपाल नाईक, झनक पटले, गमचंद तुरकर, गर्राचे माजी सरपंच मनोज बोरकर, रावणवाडीचे सरपंच कुंजाम, राजेंद्र कटरे, चरण टेंभरे, हरिविठ्ठल ठाकरे, सदाराम येरणे, रघू येरणे, प्रदीप घोडेस्वार, सिरपूरचे सरपंच येरणे, मोगर्राचे सरपंच नागपुरे, चारगावचे सरपंच राधेलाल पटले, राजेश माने, आशिष चव्हाण, वडेगावचे सरपंच देशकर, जे.सी. तुरकर, बकाराम रहांगडाले, अर्जुनीचे उपसरपंच सूर्यप्रकाश भगत आदी उपस्थित होते.
विकासाच्या संकल्पनांचा विरोधकांकडे अभाव
By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST