पतसंस्थेची कार्यप्रणाली : घरातील वस्तू करतात जप्त साखरीटोला : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने सध्या शेतकऱ्यांकडून जबरण कर्जवसुलीचा सपाटा पतसंस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. कर्ज न भरल्यास घरातील मिळेल ती वस्तू जप्त केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असून कोणाकडे कैफियत मांडायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था सातगाव तालुका सालेकसाच्या वतीने कर्ज वसुली पथक तयार करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांवर थकित कर्ज आहे, त्यांच्याकडून जबरदस्ती कर्ज वसूल करण्याचा सपाटा सुरु केला आहे. या पथकाने १८ मार्च २०१७ ला कारुटोला येथील कर्जदार शेतकरी राधेश्याम लालू खोब्रागडे यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी ते व त्यांची पत्नी प्रकृती बरी नसल्याने औषधोपचाराकरिता रूग्णालयात गेले होते. त्यांची मुलगी (१७) एकटीच घरी होती. मुलीने आई-बाबा रूग्णालयात गेले आहेत, असे सांगितल्यानंतरही वसुली पथकाने घराच्या मागील बाजूने घरात घुसून घरातील टी.व्ही. संच काढून सोबत नेले. तसेच मुलीला धमकी देऊन जबरण स्वाक्षरी घेतली, असा आरोप सदर शेतकऱ्याने केला आहे. राधेश्याम खोब्रागडे यांच्या म्हणण्यानुसार, सत्र २००९-१० या वर्षात सदर पतसंस्थेकडून क्रॉप्ट लोन घेतले होते. हे कर्ज भरण्याच्या तयारीत असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली. गोंदिया येथील डॉ. बाहेकर यांच्या रूग्णालयात उपचार केला. त्यामुळे यात त्यांना बराच खर्च आला. यातून त्यांनी एक एकर जमीन विकली व त्यातून आपला औषधोपचार करवून घेतला. कर्जाची काही रक्कमदेखील भरली. मात्र पुन्हा प्रकृती बिघडली. त्यामुळे उपचाराकरिता खर्च करावे लागले. अशा परिस्थितीमुळे काही कर्ज बाकी राहिले. अशा कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता पतसंस्था जबरण कर्ज वसुली करुन नव्हे तर वस्तू जप्त करुन भयभित करीत आहे. या प्रकरणामुळे सदर शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला असून जीवन कसे जगावे? असा प्रश्न पडला आहे. आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची रितसर तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून चौकशी करुन योग्य कार्यवाही करावी व न्याय द्यावा, अशी मागणी राधेश्याम खोब्रागडे यांनी केली आहे.(वार्ताहर)
शेतकऱ्यांकडून जबरीने कर्जवसुली
By admin | Updated: March 25, 2017 01:46 IST