कांबळे कुंटुबींयाचा संघर्ष सुरूच : पालकमंत्र्यांकडून वाढल्या अपेक्षा अर्जुनी-मोरगाव : जिल्हा परिषद शिक्षण विभाग व आरोग्य विभागीच्यावतीने एका शाळकरी विद्यार्थ्याची हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. परंतु गत चार वर्षापासून कुठलीही शासकीय मदत मिळाली नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजविले मात्र अद्यापही आर्थिक लाभापासून कुटुंबीय वंचित आहे. प्राप्त माहितीनुसार, वैभव मनोहर कांबळे हा विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडटोली येथे दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. हृदयविकाराने ग्रस्त असल्याने शिक्षण व आरोग्य विभागाच्यावतीने त्यावर उपचार करण्यात आले. शासकीय योजनेतून त्याला शल्यक्रियेसाठी १ फेब्रुवारी २०११ रोजी नागपूर येथे भरती करण्यात आले. यासाठी योजनेतून रुग्णालयाला दिड लाख रुपये खर्च देण्यात आला. मात्र वैभववरील शल्यक्रिया अयशस्वी ठरली व दुर्दैवाने यात वैभवचा ५ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. शस्त्रक्रियेनंतर मुलगा बरा होईल अशी कुटूंबियांना आशा होती. मात्र नशिबाने दगा दिला. याउलट शल्यक्रियेपूर्वीच मुलगा बरा होता. आॅपरेशन झाल नसतं तर निदान चार दिवस तरी अधिक जगला असता अशा दुखद प्रतिक्रिया मनोहर कांबळे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केल्या. शासनाच्यावतीने अशा पिडीत कुटुंबीयांना राजीव गांधी विद्यार्थी दुर्घटना मृत्यू योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळत असल्याचे समजते. हा लाभ मिळण्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला. मात्र या प्रस्तावासोबत शव विच्छेदन अहवाल जोडलेला नसल्याने संचालकांनी हा प्रस्ताव नाकारल्याचे समजते. आर्थिक लाभ मिळण्यासंबंधाने लोकशाही दिनात तक्रार करण्यात आली. यावर संबंधित विभागाने तक्रारकर्त्याला उचित न्याय द्यावा अशी शिफारस करण्यात आली. या बाबीला तब्बल तीन वर्ष लोटले मात्र शिक्षण व आरोग्य विभागाकडून कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. अजूनही लाभार्भी अनुदानापासून वंचित आहे.तक्रारकर्ता मनोहर यांनी आमदार, खासदार व या परिसरातील मंत्र्यांना निवेदन दिले. पण कुणाच्याही हृद्याला पाझर फुटला नाही. आजही मनोहर शासकीय अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे. शासकीय अनुदानाच्या राशी एवढा खर्च हेलपाट्या घालण्यात केला. परंतु उपयोग झाला नाही. आता तिन वर्षांचा कालावधी लोटूनही मदत तर मिळाली नाहीच. मात्र या मतदार संघाचे आमदार हे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री आहेत. शासकीय योजनेतून त्यांनी लाभ द्यावा अशी आशा बाळगून मनोहर कांबळे यांनी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बाळ गमावूनही मदतीपासून वंचित
By admin | Updated: May 15, 2015 00:49 IST