तिरोडा : कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच कोरोनाचे संकटदेखील दूर पळवायची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलीस म्हणजे केवळ दंडुके उगारणारे, असा समज अनेकांच्या मनात आहे. पण, पोलीसदेखील माणूसच आहेत. त्यांच्यातदेखील संवेदना असतात, याचेच उदाहरण बुधवारी (दि. २१) तिरोडा येथे पाहण्यास मिळाले. लॉकडाऊनच्या भिकारी आणि भटकंती करणाऱ्यांचे सर्वाधिक हाल हाेत आहेत. अशाच भटकंती करणाऱ्या लोकांची तिरोडा पोलिसांनी जेवणाची सोय केली व त्यांना अन्न धान्यदेखील दिले. त्यामुळे गरजवंतांच्या मदतीसाठी खाकी धावून आल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले.
लॉकडाऊनचा बंदोबस्त पाळूनही भुकेमुळे कुणी उपाशी राहू नये, याकरिता ठाणेदार योगेश पारधी आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकीचा परिचय देत मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या भूमिकेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांवरील ताण वाढला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जवळपास २४ तास कर्तव्य बजावावे लागते. पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य पार पाडत असताना सामाजिक बांधिलकीही जपत असल्याचे चित्र तिरोडा येथे पाहायला मिळाले. रस्त्यावर फिरणाऱ्या भिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. एक भिकारी रस्त्यावर पडलेला असताना पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी भिकाऱ्याला रुग्णालयात पाठवून औषधोपचाराची व्यवस्था केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस विभाग कारवाई करीत आहेत. अशातच कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधिलकीसुध्दा जोपासत आहेत. पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनवते, पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, महिला पोलीस निरीक्षक राधा लाटे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिरोडा पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावतानाच भुकेलेल्यांना मायेने स्वखर्चातून जेवण देत आहेत.