केशोरी : परिसरात कोरोना महामारीची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन ‘माझा गाव माझा परिवार’ अभियानांतर्गत १५ ते ३० एप्रिलपर्यंत गावासाठी कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी केले आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता १५ ते ३० एप्रिलपर्यंत सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहतील. भाजीपाला सेवा आवश्यकतेनुसार घरपोच करून देण्याची मुभा देण्यात आली असून इतरत्र कुठेही बसून भाजीपाला विकता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. विनाकारण कोणतीही व्यक्ती गावात फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. माझा गाव माझा परिवार या अभियानाला नागरिकांनी सहकार्य करून आपले आरोग्य जपावे, असे सरपंच नंदू पाटील गहाणे यांनी कळविले आहे.