कपिल केकत/संतोष बुकावन - गोंदिया लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभुतपूर्व यशाने जिल्ह्यात आज जल्लोष व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताश्यांच्या तालावर कार्यकर्ते नाचत व जयघोष करीत आपला उत्साह व्यक्त करताना दिसून आले. सकाळपासूनच निवडणुकीचा निकाल येणार व यात कोणता उमेदवार विजयी होईल याची उत्सुकता मतदारांमध्ये होती. निकाल बघण्यासाठी सकाळी ८ वाजतापासूनच घराघरांत टिव्ही सुरू होते. सुटीचा दिवस नसल्याने सरकारी कार्यालयात संगणकावरच इंटरनेटच्या माध्यमातून निकाल बघण्यात कर्मचारी गुंग असल्याचे दिसून आले. देशाच्या निकालासोबतच आपल्या मतदार संघात कोणता उमेदवार निवडून येणार याविषयीची उत्सुकता अधिक जास्त प्रमाणात जाणवली. यासाठी सोशल मिडियाचाही वापर करताना मतदार दिसून आले. गोंदिया व भंडारा लोकसभा क्षेत्राची निवडणूक काही जास्तच अटीतटीची होती. केंद्रातले दिग्गज मंत्री प्रफुल्ल पटेल येथून रिंगणात असल्याने अवघ्या देशाचे लक्ष गोंदिया व भंडारा लोकसभा क्षेत्राच्या निकालाकडे लागले होते. मात्र सकाळी निकाल सुरू झाल्यापासूनच महायुतीचे उमेदवार नाना पटोले हे आघाडीवर असल्याने भाजप-सेनेच्या गोटात जल्लोष होता. राष्ट्रवादीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या फेरीत तरी भाईजी आघाडी घेतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत होते. मात्र सुरूवातीपासूनची आघाडी नानांनी सोडली नाही व अखेर गोंदिया व भंडारा लोकसभा क्षेत्राची ही जागा नानांनी महायुतीच्या झोळीत टाकली. गोंदिया- निकालाचा फरक वाढत जात असल्याने निकालाची अधिकृत घोषणा होण्याआधीच येथील भाजप व शिवसेना जिल्हा कार्यालयात फटाके फोडून व मिठाई वाटून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात येत असल्याचे चित्र होते. सकाळपासूनच भाजप-सेनेचे कार्यकर्ते व शहरातील त्यांच्या चाहत्यांनी फटाके फोडून नानांच्या विजयाचा आगाज करून दिला होता. शहरातील बाजारपेठ तर नानांच्या विजयाच्या या वाटचालीने काही जास्तच आनंदी दिसून आली. सकाळपासूनच बाजारातील गोरेलाल चौकात कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी करीत असताना दिसून येत होते. ढोलताश्यांच्या गजरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या तरूण कार्यकर्त्यांंनी नाचत व नानांचा जयघोष करीत त्यांचा विजय साजरा केला. विशेष म्हणजे व्यवसायिक आपले काम सोडू शकत नसल्याने त्यांनी मात्र निकाल बघण्यासाठी आपापल्या प्रतिष्ठानांमध्ये व्यवस्था करून घेतली होती. तर काहींनी शेजार्यांकडे जाऊन आपली ही हौस पूर्ण करून घेतली. निकालाचा दिवस असल्याने सर्वांंनी बाहेर निघण्याचे टाळले व याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवत होता. एरवी बाजारात असणारी गर्दी मात्र आज बघावयास मिळाली नाही. बाजारातील रस्ते ओस पडले होते व त्यात मात्र फक्त कार्यकर्त्यांंंची वर्दळ नजरेत पडत होती. अर्जुनी मोरगाव- येथील भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांंनी भाजपच्या तालुका कार्यालयासमोर फटाके फोडून मिठाई वाटप करीत नाना पटोलेंच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी दुर्योधन मैंद, प्रमोद पाऊलझगडे, वर्षा घोरमोडे, राकेश शुक्ला, किशोर ब्राम्हणकर, बालू बडवाईक, संजय पवार, अरूण मांडवगने, बबन बडवाईक, अजय पशिने, अजय पालीवाल, बाजीराव तुळशीकर, गुरूदेव राऊत, तानाजी लंजे, हिरालाल घोरमोडे, यादोराव कुंभरे, देवेंद्र टेंभरे, होमराज ब्राम्हणकर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तिरोडा- येथे काही ठिकाणी फटाके फोडून कार्यकर्त्यांंंनी विजयाचा आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे येथे राष्ट्रवादीचा प्रभाव असल्यामुळे तर आमदार डॉ. खुशाल बोपचे स्थानिक नसल्याने पाहिजे तसा आनंद दिसून आला नाही. सडक अर्जुनी- येथील दुर्गा चौक स्थित आमदार राजकुमार बडोले यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांंंनी फटाके फोडले. तसेच ढोल ताशांच्या गजरात नाचत गात आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्याम शिवणकर, लक्ष्मीकांत धानगाये, अर्जुन घरोटे, पद्मा परतेकी, कविता रंगारी, ब्रह्मनंद मेश्राम, खेमराज भेंडारकर, जागेश्वर पटोले, दिलीप गभणे, मधु अग्रवाल, अनिल मुनेश्वर, प्रमोद लांजेवार, ईश्वर गहाणे, नंदू तरोणे, वसंत गहाणेसह मोठय़ा संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गोरेगाव- तालुका कार्यालयासमोर फटाके फोडून पटोलेंच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. तसेच गावात विजय मिरवणूक काढण्यात आली. आमदार डॉ. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत डॉ. लक्ष्मण भगत, दिलीप चौधरी, हिरालाल रहांगडाले, सुरेश रहांगडाले, प्रदीप बोपचे, साहेबलाल कटरे, फनींद्र पटले व मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपमध्ये जल्लोष
By admin | Updated: May 17, 2014 00:21 IST