काचेवानी : तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे पूरक पाणी योजना म्हणून ग्रामीण पाणी पूरवठा योजनेंतर्गत २०१३-१४ साठी नळ योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामाचे पाईपलाईन खोदकाम आणि पॅकिंग करण्यात अनियमितता असून अंदाजपत्रकाच्या विपरीत काम होत आहे. या कामाचा तपास पूर्ण होईपर्यंत काम थांबविण्यात यावे, अशी मागणी बेरडीपारचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डॉ.गणेश कोल्हटकर यांनी केली आहे. बेरडीपार येथे २००४ मध्ये प्रादेशिक पाणी पूरवठा योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेचा जलकुंभ चार किमी अंतरावर असून, नियमितपणे पाईप लाईनमध्ये बिघाड येत असल्याने नळ योजना कधी बंद तर कधी सुरू राहत होती. याकरिता पूरक पाणी योजना म्हणून ग्रामीण पाणी पूरवठा योजनेंतर्गत ९५ लाख रुपयाची तरतूद करून कार्यान्वित करण्यात आली. या कामात जलकुंभ (विहीर) तयार करणे आणि गावात नळाची व्यवस्था करण्यासाठी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. बेरडीपार हे ५१५ कुटुंबांचे गाव असून एकूण लोकसंख्या दोन हजार ८०० च्या जवळपास आहे. गावात पिण्याच्या पाण्याची मोठीच अडचण आहे. पिण्याच्या पाण्याच्या सोयीकरिता नळ योजनेचे काम नागपूर येथील सातपुते नामक कंत्राटदाराला असून त्याने पाईप लाईन तयार करताना अनियमितता आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप डॉ. गणेश कोल्हटकर यांनी केला आहे. कोल्हटकर यांनी सांगितले की, पाईप लाईन ही तात्पुरती नसून दिर्घकालीन आहे. त्यामुळे पाईप लाईन घालताना काळजी घेण्याची गरज आहे. मात्र कसलीही काळजी घेतली जात नाही. पाईप लाईन घालताना कमीतकमी ३ फुटाची खोली असणे गरजेचे आहे. त्यातील माती काढून रेती घालून, नंतर पाईप घालावे लागयते. परंतु कंत्राटदाराने असे काहीही केले नाही. जेसीबीने माती खोदून त्याठिकाणी पाईप घातले आहेत. गावात विहिरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत अशीच स्थिती असल्याचे कोल्हटकर यांनी सांगितले. पाईप लाईनचे खोदकाम सुरू असताना दीड ते दोन फूट खोली दिसून आल्यावर डॉ. गणेश कोल्हटकर यांनी खोदकाम थांबविण्याची सूचना जेसीबी चालकांना दिली. मात्र काम थांबविण्यात आले नाही. यात सरपंच आणि कंत्राटदार यांची साठगाठ असल्याचा आरोप गणेश कोल्हटकर यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे पाईप, खोदकामात अनियमितता, पाईप घालताना कसलीही काळजी न घेणे अशा अनेक चुका केल्या जात आहेत. याबाबत विचारल्यावर सरपंच बेजबाबदारपणाचे उत्तरे देवून ठेकेदार कोण आहेत? दूृरध्वनी क्रमांक नाही. कामाच्या वेळी आपण उपस्थित नव्हतो. असे बेजबाबदारीचे उत्तर सरपंच प्रकाश ठाकरे देत असल्याचे ग्रा.पं. सदस्य व माजी सरपंच गणेश कोल्हटकर यांनी लोकमतला सांगितले आहे. (वार्ताहर)
बेरडीपार नळयोजनेच्या कामात अनियमितता
By admin | Updated: May 10, 2014 00:21 IST