पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील मालीजुंगा, रेगेंपार, बकीटोला परिसर नैसर्गिक वनसंपदेने नटलेला आहे. परंतु येथे मोठ्या प्रमाणात गिट्टी व नाल्यामधील रेतीचा उपसा अवैधरीत्या होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष आहे.सडक-अर्जुनी तालुक्यातील बहुतेक घाटांचे लिलाव झालेले आहेत. परंतु रेगेंपार नाल्याचा लिलाव झालेला नाही. या ठिकाणातून व्यापारी वर्ग वनविभागातील राऊंड आॅफिसर जे.जी. खोब्रागडे, वनरक्षक व वनमजूर यांच्यासह संगनमत करून मोठ्या प्रमाणात रोजच रेतीचा अवैध उपसा होत आहे. काही लोक वनविभागाच्या क्षेत्रातून अवैधपणे गिट्टीचा उपसा करताना दिसत आहेत. याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली तरी त्यांच्यावर कसलीही कारवाई केली जात नाही. पण रेतीचा अवैध उपसा करणारे दोन ट्रॅक्टर सडक-अर्जुनीचे नायब तहसीलदार ए.आर. मेश्राम यांनी पकडून दंड वसूल केला.तसेच रेगेंपार नाल्यातून अवैधपणे रेतूचा उपसा करताना वनरक्षकांनी पकडले असता त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना अभयदान दिल्याचे बोलले जात आहे. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी करून वनरक्षक व वनमजुरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.रेती व गिट्टीचा अवैध उपसा होत असतानाही संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे माफिया व अधिकारी यांचे संगनमत असल्याचे परिसरात बोलले जाते. या प्रकारामुळे एकीकडे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे व यासाठी अधिकारीच जबाबदार असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. (वार्ताहर)
अवैध रेती व गिट्टीचा उपसा सुरूच
By admin | Updated: March 26, 2015 01:15 IST