गोंदिया : राज्य नियोजन विभागाचे मुख्य सचिव सुनील पोरवाल यांची भेट घेऊन आ. गोपालदास अग्रवाल यांनी जिल्ह्यात त्वरित जिल्हा नियोजन समिती गठित करण्याची विनंती केली होती. यावर मुख्य सचिवांनी त्वरित जिल्हा नियोजन समिती गठित करण्याचे निर्देश दिले. आ. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर जिल्ह्यात आता नवीन जि.प. सदस्य व पदाधिकारी कार्यरत आहेत. परंतु जिल्हा नियोजन विभागाद्वारे जिल्ह्याच्या निधीला मनमर्जीपणे खर्च करण्यासाठी षडयंत्र केले जात आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची निवडणूकच केली जात नाही. आ. अग्रवाल यांनी मुख्य सचिव पोरवाल यांना नियमानुसार निवडणूक घेण्याची विनंती केली. यावर पोरवाल यांनी गोंदिया जिल्हा नियोजन समितीची त्वरित निवडणूक घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीमध्ये नगर परिषद व जिल्हा परिषद सदस्यांमधूनच सदस्यांद्वारे काही सदस्यांची निवड केली जाते. तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, जि.प. व न.प. चे अध्यक्ष या समितीचे पदसिध्द सदस्य राहतात. तसेच जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्ह्यातील सर्व विकास कार्यासाठी निधी मंजूर केला जातो. मात्र समितीचे गठन न झाल्यामुळे आतापर्यंत अधिकारी संगनमत करून जिल्हा विकास निधीची वाट लावत आहेत, असे प्रसिद्धीपत्राद्वारे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा नियोजन समिती गठित करण्याचे निर्देश
By admin | Updated: October 31, 2015 02:44 IST