आमगाव : भरधाव वेगात धावणारी इनोवा रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला आदळल्याने त्या वाहनातील आठ लोक गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारच्या दुपारी १ वाजता आमगाव तालुक्याच्या किंडगीपार परिसरात घडली. एमएच ३० एल ८६४० ही इनोवा भरधाव वेगात जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या पळसाच्या झाडाला धडकले. यात वाहनाचा चेंदामेंदा झाला. यातील सर्व व्यक्ती गंभीर जखमी झाले. रस्त्यापासून १० फूट अंतरावर हे वाहन गेल्याने धानाच्या शेतात घुसले. यातील जखमींना उपचारासाठी गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये सुशील सुखदेव शिवणकर (१८) रा. फुलचूर नाका, सुनील मन्साराम वालदे (३५) रा.पैकनटोली, अनिल रमेश मेश्राम (१६) रा. फुलचूरनाका, गणेश भय्यालाल बागळे (२५) रा. फुलचूर, अभिजित रहिले (१८) रा. गोंदिया, महेश झनकलाल लांजेवार (२२) रा. आरटीओ कार्यालयाजवळ गोंदिया व इतर दोन असे आठही जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.गोंदिया येथील महेश झनकलाल लांजेवार (२२) यांच्या तक्रारीवरून वाहन चालक सुनिल मंसाराम वालदे (३५) रा.पैकनटोली याच्याविरुद्ध आमगाव पोलिसांनी भादंवि कलम २७९,३३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
इनोवा झाडावर आदळली
By admin | Updated: September 29, 2014 00:47 IST