रावणवाडी : मागील काही दिवसांपासून गोंदिया तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या पावसाळ्यात बऱ्याच महिला पुरूषांना डेंग्युची लागण झाली. यापूर्वी नागरा-चांदणीटोला येथील एका नागरिकाचा डेंग्युने मृत्यू झाला आहे. सध्या ताप आलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण रक्त तपासणीत बाधित आढळून आले आहेत. यापूर्वी डेंग्युने एकाचा मृत्यू झाला. अनेक रुग्ण डेंग्युने ग्रसीत आहेत. यामुळे गाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे. रावणवाडी येथील स्वाती गजभीये, चारगाव येथील प्रगती बिसेन या दोन्ही रुग्णांची रक्त तपासणीत करण्यात आली. यात डेंग्यूची नमुने पॉझिटिव्ह आले. मागील आठ-दहा दिवसापूर्वी गावात आणि परिसरात आरोग्य विभाग रावणवाडीच्या वतीने गावात डासनाशकाची फवारणी झाली. परंतु मलेरिया, डेंग्युचे रुग्ण सतत वाढत असल्यामुळे झालेली डासनाशक फवारणी प्रत्येक्षात झाली की देखावाच करण्यात आला, अशा प्रश्न येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. रावणवाडी आरोग्य केंद्रावर आरोग्य सहायक यांची नियुक्ती सबंधित विभागाने केली आहे. डासनाशकाची फवारणीचे कार्य याचाच माध्यमातून होत आहे. या कामाकरिता जवळपास पाच कर्मचाऱ्यांची नियुक्तीही विभागाने केली आहे. आपल्यावर असलेल्या दायित्वाकडे दुर्लक्ष करून फवारणीच्या कामापासून सतत कोसो दूरच असतात. परिसरात डास नाशकाची फवारणी झालीच नाही, अशा बोंबा गावात ऐकण्यास मिळतात. परिसरात डास नाशकाची फवारणी झाली तरी डासांचा हल्ला सतत सुरूच आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. फवारणी करण्याचा कामावर दुर्लक्ष केल्याचा परिणाम आज येथील नागरिकांना सोसावा लागत आहे. आरोग्य सहायकावर वरिष्ठाची मेहरबानी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शासन डासनाशक फवारणी करिता आरोग्य केंद्राना ४,५०० रूपये प्रति किलो दराने औषध पुरवित आहे. ही औषध महागडी असल्यामुळे फवारणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत आरोग्य पर्यवेक्षक फवारणी करताना हजर राहणे आवश्यक आहे. मात्र फवारणी करतेवेळी पर्यवेक्षक उपस्थित राहात नाही. फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी औषधाची हवी ती मात्रा न टाकता कमी मात्रा टाकून निरमा पावडरच्या उपयोग करून फवारणी झाली असल्याची नागरिकांत चर्चा आहे. उर्वरित डासनाशक औषध आरोग्य निरीक्षकाच्या संगणमताने फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ती औषध भात पिकावर फवारणी करण्यासाठी विकण्याचे कामही सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रावणवाडी परिसरात आजाराची लागण
By admin | Updated: September 29, 2014 00:48 IST