गोंदिया : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा निष्पाप बालकांचा होरपळून व गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नवजात शिशुच्या कक्षातील अग्निशमन यंत्रणा आणि इनक्यूवेटरवर प्रश्न निर्माण केले जात आहे. गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात इनक्यूवेटर सुध्दा निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती आहे.
शासकीय रुग्णालयात लागणारे विविध साहित्य खरेदी ही डीईएमआर अंतर्गत खरेदी केली जाते. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया याच माध्यमातून पार पडली जाते. रुग्णालयांना जे साहित्य पाठविले जाते त्याचा दर्जा चांगला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी सध्या जिल्हा स्तरावर कुठलीच यंत्रणा नाही. त्यामुळे या साहित्याची पडताळणी अथवा तपासणीच केली जात नाही. बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील नवजात शिशु कक्षातील इनक्यूवेटर खरेदी करण्यात आले. मात्र हे इनक्यूवेटर खरेदी केल्यानंतर त्यांची ट्रायल घ्यावी लागते. पण ती न घेताच ते लावण्यात आले. बरेचदा हे वार्मर आणि इनक्यूवेटर अधिक गरम झाल्यास धोका होण्याचा शक्यता असतो. त्यामुळे ते चांगल्या दर्जाचे असणे आवश्यक आहे. तसेच यांची नियमित देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तंत्रज्ञ असणे आवश्यक आहे. पण सद्यस्थितीत दोन तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावरच संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील यंत्रसामुग्रीची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी असल्याची माहिती आहे. भंडारा येथील घटनेनंतरही आरोग्य यंत्रणेला जाग आली नसल्याचे चित्र आहे.
........
जीर्ण इमारती तोडगा
बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारत बांधकामाला ८२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ही इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. मात्र अजूनही या धोकादायक इमारतीत गर्भवती महिला आणि बालकांवर उपचार केले जात आहे. या इमारतील हे वाॅर्ड इतरत्र हलविण्यासाठी कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही.
.......
प्रफुल्ल पटेल यांनी खडसावले
बाई गंगाबाई महिला रुग्णालयाची जीर्ण इमारत, रुग्णालयाच्या फायर आणि इलेक्ट्रीक ऑडिटकडे दुर्लक्ष होत असल्याची दखल घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. तसेच काय काय त्रुटी आहेत, त्या दूर करण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे याचा आढावा घेऊन माहिती सादर करण्यास सांगितले. त्यानंतरच बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे.