गोंदिया : मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, रुग्णवाढीचा वेग कायम आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता कायम आहे, तर मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात मंगळवारी (दि.२०) ९२४ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ६१२ बाधितांनी कोरोनावर मात केली. २१ बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मंगळवारी आढळलेल्या ९२४ बाधितांमध्ये सर्वाधिक ४६१ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १०४, गोरेगाव ११८, आमगाव ३२, सालेकसा ३२, देवरी ६७, सडक अर्जुनी १९, अर्जुनी मोरगाव ८८ व बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या तीन तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ग्राणीम भागातसुद्धा रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनासंसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,२५,००० जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १,०३,६३७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत १,१८,९२७ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १,०४,६४६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २७,०८४ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १९,९११ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ६,७८६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३,५८६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी ५,३७३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
........
२२ हजार डोस प्राप्त
जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविली जात आहे. मंगळवारी जिल्ह्याला २२ हजार डोस प्राप्त झाले. त्यामुळे संपूर्ण १४० केंद्रांवरून लसीकरण मोहिमेला गती आली आहे. किमान आठवडाभर पुरेल एवढा लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
.................
कोरोनावरील औषधांचा तुटवडा कायम
कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवड्यापाठोपाठ आता कोरोनावरील फॅबीफ्यू औषधाचासुद्धा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या औषधांचा स्टॉक आला नव्हता. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची या औषधांसाठी भटकंती कायम होती.