देवानंद शहारे गोंदियाजिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी केवळ सहा तालुका मुख्यालयी एसटी महामंडळाची बस स्थानके आहेत. मात्र तीसुद्धा परिपूर्ण नाहीत. कुठे पाणीच नाही तर कुठे मुत्रीघर, शौचालय नाही. कुठे पंखे नाहीत तर कुठे कर्मचारीच गायब असतात. एक ना, अनेक समस्यांनी ग्रामसलेल्या या बस स्थानकांची व्यथा मांडण्याचा हा प्रयत्न लोकमत चमूने केला आहे. लग्नसराईत महामंडळाला भरभरून उत्पन्न मिळवून देणाऱ्या एसटी प्रवाशांच्या गैरसोयी यापुढे तरी एसटी महामंडळाने दूर कराव्यात, ही अपेक्षा आहे.दिलीप चव्हाण ल्ल गोरेगावयेथील बस स्थानकात बऱ्याच गैरसोयी असून थांबण्याच्या सुविधेपासून तर पिण्याच्या पाण्यापर्यंत सदर बसस्थानक उपयुक्त नाही. त्यामुळे या बस स्थानकात प्रवाशीच थांबत नसून बस स्थानकातील दोन्ही कार्यालये कुलूपबंद अवस्थेत राहतात. सात वर्षांपूर्वी येथील मुख्य रस्त्याला लागून लाखो रुपये खर्च करुन बस स्थानकाची इमारत बांधण्यात आली. पण सोयी-सुविधांच्या अभावी या बस स्थानकांत गाईढोरांचे वास्तव्य पहावयास मिळते. मुख्य म्हणजे या बस स्थानकात पाण्याची सोय नाही. प्रवाशांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. कार्यालयसुद्धा नेहमी कुलूपबंद राहत असल्यामुळे प्रवाशी या बस स्थानकात बसची वाट पाहणे टाळतात.येथील मुख्य चौकात एक बसस्थानक आहे, तर मुख्य बसस्थानक दुर्गा चौकापुढे आहे. दुर्गा चौकातील बस स्थानकांत तेवढी वर्दळ राहत नाही. येथे प्रवाशीही नसतात. येथे बस येते आणि लागलीच परत जाते. त्यामुळे प्रवाशी मुख्य चौकातील बस स्थानकावरच उभे राअहून बसची वाट पाहतात. मात्र येथेही सोयी-सुविधा नाहीत. पाण्याची सोय नाही, मुत्रीघर व शौचालय नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय होते. सदर बस स्थानक टिनाचे असल्यामुळे जीर्ण झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या बस स्थानकात उन्ह राहत असल्यामुळे व प्रवाशी इतरत्र पानटपऱ्या व हॉटेलमध्ये जावून बसची वाट पाहतात. नव्या बस स्थानकचा काहीच उपयोग होत नसल्यामुळे सदर बसस्थानक फक्त शोभेचे ठरत आहे. या बस स्थानकात नव्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गैरसोयींनी ग्रासली बसस्थानके
By admin | Updated: April 26, 2015 01:04 IST