बिजेपार : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत येथील शासकीय आश्रमशाळेत तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कला स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.९) पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच नितू वालदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमशाळेचे प्राचार्य एस. एम. रामटेके, सहायक प्रकल्प अधिकारी बेले, पोलीस उपनिरीक्षक पुजारी, पुराडा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक लांजेवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिना उईके उपस्थित होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे यांनी खेळाडूंना संबोधित करताना म्हणाले, खेळातून सुद्धा नाव पैसा कमविता येते. त्यासाठी तुमची जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाची मनापासून तयारी असली पाहिजे. तुम्ही शिस्तीचे पालन केल्यास काहीच अशक्य नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान उपस्थित इतर पाहुण्यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. या तीन दिवसीय क्रीडा संमेलनात जमाकुडो, पुराडा, पिपरीया, सालेगाव, ठाणा, कामठा, कोकणा/जमी. व मकरधोकडा या आठ आश्रमशाळांतील खेळाडूंनी भाग घेतला आहे. संचालन देव बंसोड यांनी केले. आभार ए.बी.गणवीर यांनी मानले. क्रीडा व सांस्कृतीक कला संमेलनासाठी क्रीडा प्रमुख विजय मेश्राम यांच्यासह आश्रमशाळेतील अन्य कर्मचारी सहकार्य करीत आहेत. (वार्ताहर)
केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कला संमेलनाचे उद्घाटन
By admin | Updated: October 12, 2015 02:06 IST