विनापरवानगी होतेय काम : शासनाला दररोज लागतो लाखोंचा चुना सौंदड : प्राकृतिक खजिन्यातून वर्षापोटी लाखो रुपये शासनाला मिळतात. अनेक घाट लिलावातून वसुलीत मोठी रक्कम शासनाला मिळते. शासन हाच पैसा देशाच्या उन्नतीकरिता लागतो. मात्र अनेकदा अवैधरित्या उत्खन्नातून शासनाला लाखो रुपयांचा चुना सुद्धा लागत आहे. सडक अर्जुनी तालुका गौनखनिज उत्खननाकरिता प्रख्यात आहे. तालुक्यातील सौंदड गाव अवैध उत्खननाकरिता वारंवार चर्चेत येते. सौंदड ते फुटाळा व सौंदड ते बोपाबोडी या मार्गाने मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन होत आहे. बोपाबोडी वनविभागातील जागेतून मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन होत आहे. तर सौंदड फुटाळा तलावानजीक जागेतून विनापरवाना मुरुम उत्खनन होत आहे. सौंदड परिसरातील विविध ठिकाणाहून मुरुम, रेती, दगड, विटा विनापरवाना वाहतूक केली जात आहे. अवैध उत्खननधारक ट्रॅक्टर व ट्रालीलाही विना गाडी क्रमांक रस्त्यावर चालवितात. अनेकवेळा अपघात होतात. पण गाडीवर क्रमांक नसल्याने वाहन धारक पसार होतात. वनविभाग, तहसीलदार व परिवहन विभाग या सर्व बाबींकडे कानाडोळा करीत आहे. अनेकवेळा गावकरी स्वत: अधिकाऱ्यांना स्वत:ही फोन करुन सांगतात की, या ठिकाणावरुन अवैध उत्खनन होत आहे. परंतु कुणीही तक्रारकर्त्याकडे लक्ष द्यायला तयार असल्याचे दिसून येत नाही. दोन दिवसाअगोदर नॅशनल हाईवे क्र.६ च्या बाजूला मुरुम टाकतानाही ट्रॅक्टर उलटले. पण त्याला कुणीही जाब विचारायला तयार होत नाही. हा खनिज साठा कुठून आला व काय परवाना आहे, याची चौकशी होत नाही. अधिकाऱ्यांना अवैध कामांचे हप्ते तर पोहोचत नाही, असा गवगवा परिसरात सुरू आहे. या सर्व अवैध धंद्यावर आळा घालण्यात यावा, अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. (वार्ताहर)
गौण खनिजांचे अवैध उत्खनन
By admin | Updated: March 13, 2017 00:22 IST