आझाद उर्दू शाळा : सूचना फलकावर लावला चुना, नोटीसही फाडलेगोंदिया : अनेक दशकांपूर्वी मुस्लिम समाजाद्वारे आझाद लायब्ररीची स्थापना ट्रस्टद्वारे करण्यात आली होती. आता ही इमारत जीर्ण झाल्याने व कधीही धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या ट्रस्टींनी सदर इमारत पाडून नवीन इमारत तयार करण्याबाबत नगर परिषदेला पत्र लिहिले. नगर परिषदेने आझाद उर्दू शाळेतील शिक्षण थांबविण्याचे आदेश त्वरित काढले. मात्र प्राचार्याने शाळेचे अध्यक्ष व सचिवाच्या इशाऱ्यावर सदर आदेशाला केराची टोपली दाखवून आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप आझाद लायब्ररीच्या ट्रस्टींनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, अनेक दशकांपूर्वी स्थापित झालेल्या आझाद लायब्ररीची धोकादायक जीर्ण इमारत बघून तिच्या नवनिर्माणासाठी ट्रस्टींनी नगर परिषदेला पत्र दिले. पत्रानुसार, आझाद लायब्ररी ट्रस्ट नझुल शीट-३० वर प्लॉट क्रमांक ४२/९, ४२/२३ वर आहे. त्याच्या मालकी जागेवर असलेल्या आझाद उर्दू शाळेचा वरील माडा जीर्ण-जर्जर झाला आहे. तसेच भिंतीवर भेगा पडल्या असून छत तुटल्याफुटल्या अवस्थेत आहे. या इमारतीच्या जीर्णावस्थेमुळे तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीविताला कधीही धोका घडू शकतो. सदर इमारत कधीही कोसळू शकते. त्यामुळे आझाद लायब्ररीकडून मिळालेल्या पत्राला गांभीर्याने घेत नगर परिषदेने महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ च्या कलम १९४ (ब), १९५ (१), (२), (३) व (४) अंतर्गत जीवितहानी व सुरक्षेला लक्ष्यात घेवून आझाद लायब्ररीच्या मालकीमधील उर्दू शाळेच्या वरील इमारतीला (पहिला माडा) २४ तासात तोडण्याच्या आदेशाचे पत्र ५ डिसेंबर २०१५ रोजी ट्रस्ट व त्यांच्या मालकीमध्ये संचालित उर्दू शाळेला पाठविले. तसेच तेथे सुरू असलेले शिक्षण थांबविण्याचे आदेश जाहीर करून सूचना फलक व नोटीस लावण्याचेही नमूद करण्यात आले.नगर परिषदेचे पत्र मिळताच आझाद लायब्ररी ट्रस्टने नगर परिषदेच्या आदेशाचा अवलंब करून शाळेच्या त्या भागावर सूचना फलक व नोटीस लावून दिले होते. परंतु उर्दू शाळेचे प्राचार्य, अध्यक्ष व सचिव यांनी सदर सूचनेस खोटे सांगून सूचना फलकावर चूना पोतले व नोटीस फाडून नगर परिषदेच्या आदेशाची अवहेलना केली. प्राचार्य, अध्यक्ष व सचिवाने इमारत तोडण्याच्या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवून तेथे शिक्षण ग्रहण करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार केला. आझाद लायब्ररी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत शहर पोलीस ठाणे व नगर परिषद गोंदिया यांना तक्रार केली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार उर्दू शाळेवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय सदर प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येईल, अशी माहिती आझाद लायब्ररी ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
न.प.च्या आदेशाची अवहेलना
By admin | Updated: December 14, 2015 02:17 IST