अंकुश गुंडावार
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर आरोग्य विभागाकडून नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात आहेत; मात्र दुसरीकडे याच विभागाच्या दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे. केटीएस रुग्णालयात एकाच छताखाली कोरोनाचे लसीकरण, कोरोना संशयित रुग्णाची तपासणी, सीटी स्कॅन केले जात आहे. तसेच लसीकरण केंद्राला लागून कोविड केअर सेंटर आहे. त्यामुळे संसर्गाला प्रतिबंध लागणार कसा असा सवाल निर्माण झाला आहे.
सध्या कोविड लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सुद्धा लसीकरण केंद्र आहे. तर याच केंद्रालगत ५० मीटरवर कोविड सेंटर आहे. तर ज्या ठिकाणी कोरोना लसीकरण सुरू आहे त्याच ठिकाणातून कोविड रुग्णांना सीटी स्कॅन आणि एक्स-रे काढण्यासाठी नेले जात आहे. या सर्वांची एन्ट्रीसुद्धा एकाच दरवाज्यात सुरू आहे. मागील जवळपास महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे. या प्रकारामुळे लसीकरणासाठी या केंद्रावर येणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सोमवारी (दि.५) लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमधून एका रुग्णाला सीटी स्कॅनसाठी नेण्यात आले. त्यामुळे या प्रकारामुळे लसीकरणासाठी आलेले नागरिक सुद्धा घाबरले. सध्या ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे याच परिसरातून सीटी स्कॅन आणि एक्स-रेसाठी जाणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून हा प्रकार जिल्हा शल्यचिकित्सक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अद्यापही लक्षात न आल्याने आश्चर्य आहे. नागरिकांना त्यांच्या बेजबाबदारपणाची जाणीव करून देणाऱ्या आरोग्य विभागाला त्यांच्या जबाबदारीचा विसर पडल्याचे चित्र आहे.
..........
तर लसीकरणासाठी येणारेच होऊ शकतात बाधित
केटीएस रुग्णालयाच्या एका कक्षात सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. याच कक्षाला लागून सीटी स्कॅन आणि एक्स-रे सेंटर आहे. तर ५० मीटर अंतरावर कोविड केअर सेंटर आहे. त्यामुळे कोविड रुग्णांना या ठिकाणी दररोज सीटी स्कॅन करण्यासाठी आणले जाते. त्यामुळे येथे लसीकरणासाठी येणारे नागरिकसुद्धा यामुळे बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब आरोग्य विभागाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
.................
ऑक्सिजन बेडची संख्या केली कमी
जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना बेडची संख्या वाढविण्याची गरज आहे. मात्र केटीएस रुग्णालयात तयार केलेल्या १५० खाटांच्या ऑक्सिजनयुक्त बेडचे कक्ष तयार करण्यात आले होते. मात्र यापैकी ५० ऑक्सिजन बेडची संख्या कमी करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे या अजब निर्णयाचे देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
............
याकडे लक्ष देणार कोण ?
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी एकीकडे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करून राबत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवेला प्राधान्य देत आहे; मात्र दुसरीकडे याच विभागातील काही बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देणार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.