व्यवस्थापकच नाही : बंँक आॅफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना जबर फटकासालेकसा : तालुक्यातील एकमेव राष्ट्रीयकृत बँक म्हणून सर्व वर्गातील ग्राहकांसाठी उपयोगी असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रामध्ये मागील तीन महिन्यांपासून व्यवस्थापक नाही. त्यामुळे बँकेचे अनेक कामकाज रखडले असून येथील हजारो बँक ग्राहकांना जबरदस्त फटका बसताना दिसत आहे.तीन महिन्यांपूर्वी येथील नियमित व्यवस्थापकाची बदली होवून त्यांचे गोंदिया येथील बँकेत स्थानांतर झाले. परंतु त्यानंतर त्यांच्या जागी आतापर्यंत दुसरे व्यवस्थापक येथे पाठविण्यात आले नाही. तसेच येथील कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी कोणीही व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळायला तयार नाही. त्यामुळे बँकेचे पूर्ण कामकाज रखडले आहे. ग्राहकांची देवाण-घेवाणबद्दल ओरड पाहून एका सहायकाला विड्रॉल देण्याचे व जमा करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही ग्राहक फक्त आपल्या खात्यात रक्कम टाकू शकतो किंवा रक्कम काढू शकतो. याशिवाय कर्ज काढणे, शासकीय विविध योजनांचा लाभ घेणे आदी कामे मुळीच होत नाही. नुकतीच केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना सुरू केली. परंतु या योजनेची अंमलबजावणी आतापर्यंत येथे करण्यात आली नाही. कर्ज काढण्याचे हजारो प्रकरण व अर्ज बँकेत पडून आहेत. परंतु येथील लोकांना कर्ज दिले जात नाही. बँक आॅफ महाराष्ट्र संपूर्ण सालेकसा तालुक्यात एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्याने तालुक्यातील बहुतांश लोकांना या बँकेशी विविध कामासाठी संबंध येतो. परंतु व्यवस्थापक नसल्याने शेकडो ग्राहकांना दररोज आल्यापावली परत जावे लागते. सालेकसा हे तालुक्याचे स्थळ असून व एकमेव बँक असूनसुद्धा संबंधित विभाग या बँकेत व्यवस्थापक का पाठवत नाही, याचे आश्चर्य वाटत आहे. तसेच लोकांची कामे होत नसल्याने लोक मोठ्या प्रमाणात संतापले आहे. लवकरात लवकर या बँकेला नियमित व्यवस्थापक मिळावा, अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेकडो कर्ज प्रकरणे धूळ खात
By admin | Updated: December 17, 2015 01:53 IST