केशोरी : जिल्ह्यासह ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधी निर्देश वांरवार दिले जात आहेत. मात्र, यानंतरही स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत खातेधारकांकडून गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसल्यामुळे कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या परिसरामधून केशोरी येेथे एकच मध्यवर्ती बँक शाखा असल्यामुळे येथे दररोज शेतकरी शेतमजूर, कर्मचारी निराधार योजना लाभार्थी, बचत गटातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात बँक व्यवहारासाठी येतात. त्यामुळे या बँक शाखेत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. कोरोना या महामारी संसर्गाची साखळी कोण तोडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक बंद होण्याच्या वेळेपर्यंत सतत गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्याच्या कोरोनाचा दुसऱ्या टप्प्यातील रुग्ण वाढीचा उद्रेक आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन सजग राहून कोरोना नियम पाळण्यासंबंधी सूचना देत असते; परंतु या सूचनांकडे कोणीही लक्ष देत नाही. परिणामी, कोरोनाचा उद्रेक होऊन कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परिणामी, प्रशासनाच्या चिंतेत भर पडत असताना मध्यवर्ती बँक शाखा प्रशासन याबाबत फारसे गंभीर नाही. कोरोना संसर्गाची साखळी तोडणे किंवा गर्दी कमी करण्यासाठी बँकेत बसण्याची किंवा उभे राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था करणे आणि गेटमधून एक एक ग्राहक बँकेत जाईल, अशी व्यवस्था करणे अपेक्षित आहे.