चैतराम हेमलाल पिछोडे (३५, रा. पांढरी) असे जखमी मजुराचे नाव आहे. आरोपी विमला लालचंद बिरीया (३५,रा. पांढरी) यांना शासनातर्फे घरकूल योजनेचा लाभ मिळाला. या घरकुलाच्या बांधकामासाठी खड्डे खोदण्यासाठी चैतराम हेमलाल पिछोडे (३५) या घराजवळील इसमाला मजुरीने बोलाविले होते. आरोपी व जखमी एकमेकाच्या शेजारी राहतात. या खड्डे खोदकामाचे १८०० रुपये मजुरी मागण्यासाठी चैतराम हेमलाल पिछोडे हा विमला लालचंद बिरीया (३५) हिच्या घरी गेला. यावेळी त्याने मजुरी मागितल्यावर तिने मजुरी दिली नाही. यात दोघांची बाचाबाची झाली. या वादात विमलाने त्याच्या अंगावर कढईतील गरम तेल फेकले. यात तो ३५ ते ४० टक्के भाजला. त्याचा प्रथमोपचार सालेकसाच्या ग्रामीण रूग्णालयात केल्यावर पुढील उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. आरोपी विमला विरुद्ध सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तिला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस नायक भूपेश कटरे करीत आहेत.
मजुरी मागण्यास गेलेल्या मजुराच्या अंगावर टाकले गरम तेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST