अर्जुनी-मोरगाव : पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत या संशयावरुन एका युवकाला चाकूने भोसकल्याची घटना जानवा येथे ५ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. जखमी झाल्याने त्या युवकाला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. आरोपी रेवनाथ रामकृष्ण फुंडे याला अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केली आहे.प्राप्त माहितीनुसार, संतोष भिवाजी बहेकार हा गावातील पानटपरीवर खर्रा खाण्यासाठी गेला होता. त्यापूर्वीच त्याचा भाऊ सुभाष हा कॅरम खेळत होता. संतोषच्या मागेमागेच आरोपी पानटपरीवर आला व दोघा भावंडांना उद्देशून तुमचा गठ्ठा बांधून मर्डर करतो, असे म्हटले. तेव्हा सुभाषने चांगला बोल असे म्हटले. तुम्ही माझी नेहमी तक्रार करता, माझ्या पत्नीसोबत संतोषचे अनैतिक संबंध आहेत असे म्हणून वाद उफाळला. यावरुन हनुमान चौकात आरोपीने त्या दोघा भावंडांशी भांडण केले. भांडणात आरोपीने संतोषच्या डाव्या कुशीवर चाकुने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीची पत्नी गेल्या ६ महिन्यांपासून माहेरी वास्तव्यास आहे. जखमी संतोषला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले. जखमी संतोषचा भाऊ सुभाष भिवाजी बहेकार याने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. (तालुका प्रतिनिधी)
होळीच्या दिवशी चाकूने भोसकले
By admin | Updated: March 8, 2015 01:10 IST