गोंदिया : जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी ५२१ कोटी २४ लाखांचा निधी केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयाने मंजूर करून, गोंदिया जिल्ह्यातील रस्त्याची समस्या मार्गी लावण्यास हातभार लावला आहे. यात गोंदिया-तिरोडा आणि आमगाव येथील महामार्गाचा समावेश आहे. या महामार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी तीन महिन्यांपूर्वीच दिली होती. आता केवळ यासाठी लागणाऱ्या निधीची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. पण आता काहीजण या महामार्गाचे मंजुरीचे श्रेय घेत असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी म्हटले आहे.
गोंदिया-तिरोडा तसेच गोंदिया-आमगाव या रस्त्याने वाहतूक करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे गोंदियासह आजूबाजूच्या परिसराचा विकास रखडला होता. यासाठी आपण डिसेंबर महिन्यात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन या महामार्गाच मार्ग सुकर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर याला हिरवी झेंडी दिली होती. मात्र या महामार्गासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद २०२१ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली. या महामार्गासाठी आपण सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला. त्यासंबंधीचे पत्रदेखील आहे. पण आता निधी मंजूर झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येत असल्याचा आरोप आमदार विनोद अग्रवाल यांनी केला. श्रेयाचे राजकारण करण्याऐवजी जिल्ह्यात रखडलेल्या कामांना गती देऊन जिल्ह्याच्या विकासाला कशी गती मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. बालाघाट टी पॉइंट जंक्शन, गोंदिया येथून सुरू होणाऱ्या चार पदरी गोंदिया-तिरोडा राष्ट्रीय महामार्ग क्र.७३२ साठी २८२ कोटी मंजूर करण्यात आले आहे. पतंगा मैदान चौक गोंदिया येथून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ (गोंदिया-आमगाव) साठी २३९ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्यामध्ये किडंगीपार क्रॉसिंग आमगाव येथील चार पदरी उड्डाण पुलाचा समावेश आहे. तसेच खमारी, ठाणा व गोरठा या गावांना जोडणाऱ्या २.९५ किमी लांबीच्या चार पदरी रस्त्याचा समावेश आहे. तिरोडा-गोंदिया व गोंदिया-आमगाव रस्त्याचे काम मंजूर करण्यात आलेले आहे. या कामांना मंजुरी मिळण्यासाठी आपण तीन महिन्यांपूर्वीच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तेव्हाच त्याला त्यांनी मंजुरी दिली होती. आता केवळ बजेटमध्ये यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी म्हटले आहे.