४ पासून शिबिर : मधुमेहमुक्तीचा केला संकल्पगोंदिया : सध्या झपाट्याने वाढत असलेल्या मधुमेहासाठी आजची जीवनपद्धती जबाबदार ठरत आहे. त्यामुळे याच जीवनपद्धतीत राहून योगाच्या माध्यमातून मधुमेह कसा नियंत्रित ठेवला जाऊ शकतो याचे प्रशिक्षण आरोग्य भारती या संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे गोंदिया शाखाध्यक्ष डॉ.प्रशांत कटरे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.स्वस्थ व्यक्ती, परिवार, गाव आणि राष्ट्र या भावनेतून १९८० पासून कार्यरत आरोग्य भारती या राष्ट्रीय संघटनेची गोंदिया शाखा सुरू झाली. त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ.प्रशांत कटरे यांची निवड करण्यात आली. याशिवाय उपाध्यक्ष डॉ.वंदना अलोनी, सचिव डॉ.हेमंत बक्षी, सहसचिव डॉ.मंगेश सोनवाने आणि कोषाध्यक्ष म्हणून विजयकुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पत्रपरिषदेत या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये मधुमेहाचा आजार वाढत आहे. पण योगाभ्यासाच्या माध्यमातून मधुमेहाला नियंत्रित ठेवणे शक्य आहे. त्यासाठी येत्या ४ ते ११ आॅक्टोबरदरम्यान योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था बंगलोरद्वारा शोधण्यात आलेल्या मधुमेह नियंत्रक विशेष योगाचे प्रशिक्षण या सप्ताहादरम्यान दिले जाणार आहे. त्यासाठी पोवार सांस्कृतिक सभागृह, कन्हारटोली येथे दि.४ पासून सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान योगाभ्यास केला जाणार आहे. यात सहकारी होण्याचे आवाहन डॉ.प्रिती कटरे, जगेश निमोणकर, प्रभाकर राव, कमल चिपेकर, दशरथ खटवांनी आदीनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मधुमेह नियंत्रणासाठी आरोग्य भारतीचा योगोपचार
By admin | Updated: September 27, 2015 01:20 IST