गोंदिया : शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याची घोषणा दोन्ही बाजुच्या नेत्यांनी गुरूवारी मुंबईत करताच कार्यकर्ते आणि नेत्यांची एकच धावपळ सुरू झाली. ही ताटातुट काहींसाठी नवीन संधी घेऊन आली तर काही ठिकाणी उमेदवार शोधताना पक्षाच्या नेत्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र शुक्रवारीही कायम होते.अगदी शेवटच्या टप्प्यात युती आणि आघाडी तुटल्यानंतर जिल्ह्यातील चारही मतदार संघात गुरूवारी सायंकाळपासून हालचालींनी चांगलाच वेग घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार (दि.२७) हा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत जे उमेदवार संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आवारात पोहोचतील त्यांचेच अर्ज स्वीकारले जाणार आहे. नामांकन दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक असल्यामुळे चारही प्रमुख पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी गुरूवारी सायंकाळपासूनच धावपळ सुरू झाली होती. मात्र तिरोडा येथे शेकापचे विरेंद्र जयस्वाल वगळता कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले नव्हते. त्यामुळे अनेक प्रमुख पक्षांनी केवळ पक्षाचे नाव टाकून आपले नामांकन दाखल केले. जिल्ह्यात भाजपने आधीपासूनच चारही मतदार संघांमध्ये लढण्याची तयारी सुरू केल्यामुळे युती तुटल्याचा त्यांच्यावर फारसा परिणाम दिसला नाही. मात्र शिवसेनेची काहीशी तारांबळ उडत असल्याचे दिसून आले. काँग्रेसकडूनही तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या मतदार संघांमध्ये कोणाला एबी फॉर्म द्यायचा यावर शुक्रवारी सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब होणार आहे. आतापर्यंत ६० उमेदवारांनी भरले नामांकन भरले आहेत. शुक्रवारी गोंदियात १४, तिरोड्यात १२, अर्जुनी मोरगावमध्ये १० तर आमगावमध्ये १ अशा ३७ उमेदवारांनी नामांकन भरले. (जिल्हा प्रतिनिधी)
उमेदवार निवडीसाठी प्रमुख पक्षांची धावपळ
By admin | Updated: September 27, 2014 01:50 IST